भाषांची मिसळ

कॉंग्रेसचे सरचिटणीस दिग्विजयसिंग हे भाषण करायला लागले की, पत्रकार लेखण्या सरसावून बसतात. दिग्विजयसिंग बोलणार म्हणजे काही तरी चमचमीत माल पुरवणार अशी त्यांची खात्रीच असते. मात्र प्रत्येक वेळी ते काही तरी चमचमीत देतीलच असे काही नाही. परंतु ते साधे काही तरी बोलायला गेले तरी पत्रकार त्याला आपल्या पदरचा मसाला लावून चमचमीत करायला लागले आहेत. मात्र तसे करताना आपण भाषेचा खून करत आहोत याचे भान पत्रकारांना नाही. त्यांनी भान ठेवले नाही तरी त्यांचा प्रभाव मात्र समाजावर आहे. माध्यमांचे अभ्यासक या प्रसाराचा धोका समजावून सांगताना, त्यामुळे भाषा भ्रष्ट होण्याची शक्यता असते असा इशारा देत असतात. सध्याच्या पिढीला भाषा भ्रष्ट झाली तर काय बिघडते असे वाटते आणि जुन्या पिढीतले लोक उगाच भाषाशुद्धीचा आग्रह धरतात, अशी त्यांची तक्रार असते. मात्र काही वेळा भाषा भ्रष्ट झाल्याने मोठे घोटाळे होत असतात याचे भान त्यांना नसते. भाषा भ्रष्ट झाली तर उद्या चालून शब्दांचे अर्थ लोकांना नीट कळणार नाहीत हे त्यांनी लक्षात घेतले पाहिजे.

आपण सहजपणे बोलताना, त्याने त्यांच्या ‘अपरोक्ष’ टीका केली असे बोलतो. या अपरोक्ष शब्दामागे त्यांच्या पाठीमागे टीका केली असे सूचित करायचे असते. पाठीमागे म्हणजे समोर नसताना. या स्थितीतला नसणे हा शब्द नकारार्थी आहे. म्हणून त्याला अनुपस्थितीत म्हणतात. शब्दाच्या मागे लागणारे अ आणि अनु असे शब्द नकारार्थी अर्थ स्पष्ट करत असतात. त्यामुळे एखाद्याच्या अनुपस्थितीत टीका केली की, तिला अरोपक्ष टीका म्हणण्याची पद्धत मराठीत पडली आहे. पण अपरोक्ष हा संस्कृत शब्द असून त्याचा मूळ अर्थ समोर किंवा उपस्थितीत, तोंडावर असा आहे. मात्र आपण तो शब्द नेमक्या उलट्या अर्थाने वापरतो. तो एवढा रूढ झाला आहे की, एखाद्याने त्याचा मूळ अर्थ सांगायला सुरुवात केली तर लोक सांगणार्‍यालाच वेड्यात काढतात. भाषा भ्रष्ट झाल्यामुळे काही फरक पडत नाही असे ज्यांना वाटते ते जर अपरोक्षचा अर्थ पाठीमागे असा करत असतील तर अशा लोकावर अपरोक्षचा खरा अर्थ वापरून लिहिलेल्या एखाद्या जुन्या संहितेचा अर्थ लावण्याची पाळी आली तर ते त्या संहितेचा अर्थ नेमका उलटाच काढतील. भाषेच्या भ्रष्टाचाराचा हा दुष्परिणाम होऊ शकतो.

हिंदी शब्द मराठीत तसेच उचलल्यामुळे मराठीमध्ये सध्या अनेक घोटाळे व्हायला लागले आहेत. त्या घोटाळ्याचे उत्तम उदाहरण म्हणजे दर्शक हा शब्द. हिंदीमध्ये देखनेवाला म्हणजे दर्शक. मात्र भाषेचे फार भान न ठेवणार्‍या काही मराठी पत्रकारांनी मराठीत सुद्धा प्रेक्षकांसाठी दर्शक शब्द वापरायला सुरुवात केली आहे. खरे म्हणजे मराठीत पाहणार्‍याला प्रेक्षक म्हणतात. पण प्रेक्षकच्या ऐवजी दर्शक शब्द वापरला तर त्याचा अर्थ दाखवणारा असा होतो. पण आपण हिंदीचे भ्रष्ट अनुकरण करताना पाहणार्‍यालाच दाखवणारा म्हणायला लागलो आहोत. यावर कोणाचे लक्ष नाही. एखादा शुद्ध मराठमोळी भाषा बोलणारा माणूस यातला फरक समजून सांगायला लागला तर नवी पिढी त्याला हास्यास्पद ठरवते. कॉंग्रेस पक्षाचे सरचिटणीस दिग्विजयसिंग यांनी काढलेल्या एका उद्गारावरून सध्या जे वादळ उठले आहे त्या वादळामधून पत्रकारांच्या भाषा ज्ञानाच्या दैन्याचे दर्शन घडले आहे. दिग्विजयसिंग यांनी आजवर आपल्या जिभेच्या फटकार्‍यांनी वृत्तपत्रांना बर्‍याच बातम्या दिल्या आहेत. एखाद्या घटनेवर अन्य लोकांकडून सामान्यत: जी प्रतिक्रिया व्यक्त होते तिच्यापेक्षा काही तरी वेगळी आणि विक्षिप्तपणाची वाटेल अशी प्रतिक्रिया दिग्विजयसिंग व्यक्त करीत असतात.

आपल्या या वाचाळपणामुळे ते नेहमी प्रसिद्धीच्या झोतात राहतात. त्यांच्या या स्वभावामुळे त्यांना सरळ बोलणे सुद्धा आता कठीण होऊन बसले आहे. ते सहज काही तरी बोलायला जातात आणि त्याचा काही तरी वेगळाच अर्थ काढून वृत्तपत्रे त्यांच्या त्या उद्गाराची बातमी करतात. मात्र त्यांच्या प्रत्येक बोलण्याची बातमी करताना ते नेमके काय बोलले आहेत हे पडताळून पाहण्याची दक्षता पत्रकार घेत नाहीत. नुकतेच त्यांनी मध्य प्रदेशातल्या खासदार मीनाक्षी नटराजन् यांच्याविषयी बोलताना काढलेल्या काही उद्गारांची बातमी बरीच गाजत आहे. त्यांनी मीनाक्षी नटराजन् यांचा गौरव करताना, ‘सौ टका टंच माल’ अशा शब्दात केला. एवढे एकच विशेषण काही पत्रकारांनी उचलले आणि ते उद्गार प्रत्यक्ष न ऐकणार्‍या अनेक पत्रकारांनी त्याला आपल्या पदरची पुस्ती जोडून, ‘दिग्विजयसिंग यांचे सेक्सी उद्गार’ अशा प्रकारचे मथळे दिले. त्यांच्या या विशेषणाचा नेमका अर्थ काय? आणि त्यांनी तो कोणत्या संदर्भात वापरलेला आहे याची शहानिशा करण्याची दक्षता कोणी घेतली नाही.

मराठी भाषेमध्ये बावन्नकशी सोने असे एक विशेषण वापरले जाते. त्याचा अर्थ कोठेही नाव ठेवण्यास जागा नसलेली वस्तू किंवा व्यक्ती असा होत असतो. त्याच अर्थाने सौ टका टंच माल असे हिंदी विशेषण आहे. मात्र हिंदी भाषेची फार माहिती नसणार्‍या किंवा माहिती असून सुद्धा खोडसाळपणा करणार्‍या कोणा पत्रकाराने एवढ्या एकाच शब्दाची बातमी केली आणि खळबळजनक पत्रकारिता करण्याची आपली हौस भागवून घेतली. सध्या रस्त्यावर उभे राहून महिलांची छेडछाड करणार्‍यांची गर्दी फार वाढली आहे. हे काम करणारी टपोरी मुले शरीराने भरलेल्या बाईचा उल्लेख टंच माल असा करतात. पण हिंदीत त्याचा अर्थ तसाच होतो असा नाही. पण माल शब्दाचा एवढा एकच अर्थ माहीत असणार्‍या लोकांनी सुद्धा दिग्विजयसिंग यांच्या उद्गाराचा नीट अर्थ समजून घेतला नाही. सध्या वृत्तवाहिन्यांच्या प्रसारामुळे हिंदी आणि इंग्रजीतले अनेक शब्द मराठीत घेतले जात आहेत आणि हे शब्द घेताना तारतम्य न पाळल्यामुळे असे घोटाळे होत आहेत.

Leave a Comment