नवी दिल्ली दि.२९ – लोकसभेच्या निवडणुका मुदतीपूर्वी होण्याच्या शक्यतेने केंद्रीय निवडणूक आयोग तयारीस लागला आहे. येत्या वर्षात देशातील पाच राज्यात होत असलेल्या विधानसभांच्या निवडणुकांबरोबच कदाचित लोकसभेच्या निवडणुकाही घेतल्या जातील या शक्यतेने निवडणूक आयोगाने दोन लाख इलेक्ट्रोनिक मतदानयंत्रांची ऑर्डर बीएचइएल आणि इसीआयएल या सार्वजनिक क्षेत्रांतील कंपन्यांकडे नोंदविली असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
निवडणूक आयोगातील वरीष्ठ अधिकार्यांनी दिलेल्या संकेतांनुसार लोकसभेच्या निवडणूकाही या वर्ष अखेरीस होण्याची दाट शक्यता आहे. त्याच सुमारास मध्यप्रदेश, दिल्ली, हरयाना, छत्तीसगड आणि मिझोराम या राज्यातही विधानसभा निवडणुका होणार आहेत. दोन्ही निवडणूका एकचवेळी आल्या तर इलेक्ट्रोनिक्स मतदान यंत्रांचा तुटवडा जाणवणार आहे. परिणामी आणखी दोन लाख यंत्रांची ऑर्डर दिली गेली आहे.
भारतात मतदारांची संख्या ७८.८६ कोटी इतकी आहे तर पाच राज्यात होणार्या विधानसभांसाठी मतदार संख्या १२ कोटी इतकी आहे. निवडणूक आयोगाकडे १४ लाख मतदान यंत्रे आहेत. पैकी निम्मी २००६ सालापूर्वीची आहेत व त्यातील कांही नादुरूस्त असण्याचीही शक्यता आहे. २००६ नंतरच्या मतदान यंत्रांत एका यंत्रात ८०० मते नोंदविण्याची सुविधा आहे तर नवीन ऑर्डर केलेल्या यंत्रात ही क्षमता प्रति यंत्र २००० मते इतकी आहे असे समजते. नवीन यंत्रे येत्या सप्टेंबर आक्टोबरपर्यंतच पुरविली जावीत अशाही सूचना वरील कंपन्यांना दिल्या गेल्या आहेत.