दक्षिण अमेरिकेतील ब्राझील या देशात सध्या एक इतिहास घडतो आहे. सहा महिन्यापूर्वी पोपपदाची सूत्रे स्वीकारलेले पोप फ्रांसिस यांनी आज रविवारी रिओ डि जानेरिवो या शहराच्या समुद्र किनार्यावरील तीस लाख लोकान्च्या उपस्थितीत असलेल्या एका महासभेला संबोधित केले. जगामध्ये आजपर्यंत जेवढया मोठ्या सभा झाल्या आहेत त्यात समावेश करावा अशी ही मोठी सभा आहे. याला सभा म्हणणेही कदाचित अतिशयोक्तीचे होईल कारण तो धार्मिक मेळावा होता. तीस लाखाच्या श्रोतृवंदाकडून पोप यांनी मास नावाचा ख्रिश्चन धर्मविधी करून घेतला.
या सभेला येण्याची दक्षिण अमेरिकेत मोठी स्पर्धा लागली होती कारण दोनदोन हजार किमी अंतरावरून श्रद्धाळू याला आले होते. चार किमी लांबीच्या त्या समुद्रकिनार्यावर पोप यांच्या उपस्थितीतील प्रार्थनेत आपल्याला सहभागी होता व्हावे म्हणून लक्षावधी लोकांनी तीन दिवसापूर्वीपासून या किनार्यावर मुक्काम ठोकला होता. ब्राझील हा देश दक्षिण अमेरिकेत व दक्षिण गोलार्धात येतो. दक्षिण गोलार्धातील उष्णकटिबंधातील सध्याच्या कडाक्याच्या थंडीच्या काळात ही महासभा झाली आहे. त्यामुळे कडाक्याच्या थंडीत येवढया मोठ्या संख्येने लोकांनी उपस्थित राहावे हाच एक मोठा विक्र‘म आहे. येथे येवढी गर्दीं होण्याचे अजून एक मोठे कारण आहे ते म्हणजे मूळचे दक्षिण अमेरिकेतील असलेले पोप प्रथमच व्हेटिकनच्या प्रमुखपदी आरूढ झाले आहेत. त्याच प्रमाणे युरोपाबाहेरील व्यक्ती प्रथमच पोपपदी निवडून आली आहे. सहा महिन्यापूर्वी ते अर्जेटिनामध्ये कार्डिनल म्हणून काम करत होते. पण पोप बेनेडिक्ट सोळावे यांनी अचानक राजीनामा दिल्याने झालेल्या निवडणुकीत युरोपबाहेरील व्यक्ती प्रमुखपदी निवडून आल्याने व त्यांचा हा दक्षिण अमेरिकेचा पहिला दौरा असल्याने त्याला हा पतिसाद मिळला आहे. त्यांच्या भाषणात त्यांनी तरुणांना व अन्य सर्व श्रेणीतील श्रद्धाळूंना ज्या पद्धतीने आवाहन केले आहे त्याचा परिणाम म्हणून त्यांना चांगला प्रतिसाद मिळेल असे दिसते आहे. त्यांनी प्रथमच सर्व ख्रिश्चनांना असे आव्हान केले की, त्यांनी कोणी ‘पार्ट टाईम ख्रिश्चन असू नये. दुसरे असे की, ख्रिश्चन धर्माच्या प्रसारासाठी तरुणांनी काही वर्षे द्यावी.
गेली अनेक दशके ख्रिश्चन देशात त्यातही युरोपीय देश व अमेरिकी देश येथे ख्रिश्चनांची संख्या वेगाने कमी होताना दिसत आहे. ब्राझीलमध्येही गेल्या दहा वर्षात कॅथलिकांची संख्या 75 टक्क्यावरून 64 टक्क्यावर उतरली आहे आणि त्याच वेळी प्रोटेस्टंट व पेंटकोस्टल पंथांच्या ख्रिश्चनांची संख्या दोन कोटी साठ लाखावून चार कोटी वीस लाखावर गेली आहे. युरोपातही व युनायडेट स्टेटस ऑफ अमेरिकामध्ये ख्रिश्चनांची संख्या दहा टक्क्यांनी कमी झाली आहे. या सार्या देशात निराळेच मुद्दे ऐरणीवर आल्याने ख्रिश्चन धर्माच्या मूळच्या तत्वाच्या प्रसारांला युरोप व अमेरिकेत कामाला वाव मिळेनासा झाला आहे. युरोपमध्ये सध्या समलिंगी विवाहाला मान्यता मिळण्याचा प्रश्न महत्वाचा बनला आहे. या सार्या आव्हानांचा सामना नव्याने पदाभिषेक झालेले नवे पोप कसा करतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.