नवी दिल्ली – गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर केलेल्या टीकेबद्दल माफी मागण्यास नकार देणारे नोबेल विजेते अर्थतज्ज्ञ डॉ. अमर्त्य सेन यांच्यावर मोदी समर्थकांनी व्यक्तिगत हल्ला चढवला आहे. मोदी समर्थकांनी सेन यांची अभिनेत्री मुलगी नंदना सेन हिचा ‘टॉपलेस’ फोटो फेसबुकवर पोस्ट केला असून ‘आधी स्वत:च्या मुलगीला आवरा, मग देशाच्या भल्याचे उपदेश करा,’ असा सल्ला सेन यांना दिला आहे. ‘मोदी हे देशाचे पंतप्रधान होऊ नयेत’, अशी जाहीर इच्छा अमर्त्य सेन यांनी काही दिवसांपूर्वी व्यक्त केली होती. त्यांच्या या वक्तव्यानंतर भाजपने सेन यांना टीकेचे लक्ष्य केले आहे. भाजपचे खासदार चंदन मित्रा यांनी एनडीएची सत्ता आल्यास सेन यांचं ‘भारतरत्न’ काढून घेण्याचंही वक्तव्य केलं होतं. शिवसेनेनंही सेन यांना राजकारणात तोंड न खुपसण्याचा सल्ला देऊन टाकला होता. त्यानंतरही आपल्या भूमिकेवर ठाम राहत सेन यांनी याप्रकरणी माफी मागण्यास ठाम नकार दिला.
या पार्श्वभूमीवर मोदी समर्थकांनी सेनविरोधी मोहीम तीव्र केली आहे. भाजपचे खास प्रचारास्त्र असलेल्या सोशल साइट्सवर सेन यांच्या अभिनेत्री कन्येचा अश्लिल फोटो पोस्ट करण्यात आला आहे. ‘रंग रसिया’ या चित्रपटातील हा फोटो असून त्याबरोबर सेन यांना अनाहूत सल्लाही देण्यात आला आहे. ‘अमर्त्य सेन आधी आपलं घर आणि पोरीला सांभाळा. तेच तुमच्या हिताचं आहे. देशाबद्दल आणि मोदींबद्दल निर्णय घ्यायला भारतीय नागरिक समर्थ आहेत. परदेशी नागरिकत्व घेतलेल्या आणि बुद्धी नाठी झालेल्या म्हातार्याकडून आम्हाला कुठलाही सल्ला नको,’ अशी कॉमेंट त्यात करण्यात आली आहे. स्वत:ची पोरगी सांभाळता येत नाही आणि वर मोदींच्या गोष्टी करतात. जरा लाज बाळगा’ अशी टीकाही केली आहे. हे फेसबुक पेज ‘गुजरात भाजप’ या नावाने असून त्यावर ‘मोदी सपोर्टर’ असं लिहिलं आहे.
‘गुजरात भाजप’ नावाचे हे फेसबुक अकाऊंट गेल्या मार्चमध्ये बनवलं गेलं आहे. या पेजला लाइक करणार्यांची संख्या सध्या 5,945 इतकी आहे. कवर पेजवर भाजपच्या गोवा संमेलनचं चित्र आहे. मात्र, हे भाजपचं अधिकृत फेसबुक पेज नाही, असं गुजरात भाजपचे संपर्क सेलचे संयोजक डॉ. पराग शेठ यांनी स्पष्ट केलं आहे.