संजूबाबाचा भत्ता ऐकून नोकराच्या डोळ्यात पाणी

नवी दिल्ली – सध्या पुण्याजवळच्या येरवड्याच्या कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या संजय दत्तला आपल्या घरून काही पैसे मागविण्याची परवानगी आहे. मात्र ते किती असावे यावर अधिकार्‍याचे बंधन आहे. त्याला त्याच्या कुटुंबाकडून दरमहा केवळ चार हजार रुपये मागवता येतात. त्याची ती भत्त्याची रक्कम ऐकून त्याच्या घरातल्या नोकरांना अश्रू आवरता आले नाहीत. संजय दत्तच्या घरी ३२ नोकर चोवीस तास कामाला असतात. त्यातल्या कित्येक नोकरांना चार हजार रुपयांपेक्षा किती तरी जास्त पगार आहे. पण त्यांचा हा धनी आता तुरुंगामध्ये केवळ चार हजार रुपयात आपली गुजराण करत आहे.

संजय पत्नी मान्यता हिचा एक विश्‍वासू नोकर आहे. तो दर महिन्याला टपाल कचेरीत जाऊन त्याला चार हजार रुपयांची मनिऑर्डर करून येतो. तेवढ्या पैशात संजय दत्तला काही कूपन्स खरेदी करता येतात, ज्या कुपनाच्या बदल्यात त्याला पोस्टाची तिकिटे, पाकिटे साबण, टुथपेस्ट अशा गरजा भागवता येतात. ही गोष्ट त्याच्या नोकरांना माहीत नव्हती. पण अलीकडे ती सर्वांना कळली आणि त्याची त्याच्या बांद्रा येथील फ्लॅटमधील नोकरात चर्चा सुरू झाली. एके दिवशी मान्यताला सारे नोकर रडत असताना दिसले. तेव्हा तिला ही बातमी ङ्गुटली असल्याचे कळले.

आपला धनी सध्या जेवढे पैसे खर्चतो त्याच्या किती तरी अधिक पैसे आपल्याला मिळतात हे ऐकून त्याचे नोकर कळवळले. अग्निपथ हा चित्रपट यशस्वी झाल्यानंतर त्याने आपल्या सर्व नोकरांना प्रत्येकी २५ हजार रुपये एवढे बक्षीस दिले होते. चार आणि पाच हजाराची बक्षिसे तर त्यांना नेहमीच मिळत होती. ती सारी बक्षिसे आठवून आणि आपला धनी त्यापेक्षा कमी पैशात भागवत आहे हे पाहून ते सारे नोकर गलबलून गेले.

Leave a Comment