२० हजार कोटी मालमत्तेच्या खटल्याचा ३२ वर्षांनी निकाल

चंडिगढ – पंजाबमधील फरिदकोट संस्थानचे संस्थानिक हरिंदरसिंग ब्रार यांच्या वादग्रस्त मृत्यूपत्राचा वाद मिटला असून त्यांच्या दोन मुलींनी, हे मृत्यूपत्र बनावट असल्याचा केलेला दावा न्यायमूर्तींनी मान्य केला आहे. या दाव्याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. कारण त्यावरून सुमारे २० हजार कोटी रुपयांचे सोनेनाणे, दागिने, जागा आणि रोखरक्कम यांचा वारसा कोणाकडे जाणार हे ठरणार होते.

दिवंगत संस्थानिक हरिंदरसिंग यांची १९८९ साली निधन झाले. त्यांनी मृत्यूपत्र केलेले नव्हते. परंतु त्यांच्या नजीकच्या काही मित्रांनी एक बनावट मृत्यूपत्र तयार केले आणि आपली सारी संपत्ती एका विश्‍वस्त संस्थेला दान देण्यास तयार आहोत असे लिहून त्याखाली हरिंदरसिंग यांची स्वाक्षरी घेतली. हरिंदरसिंग हे स्मृतीभ्रंशाच्या विकाराने आजारी होते. त्यांनी हे मृत्यूपत्र १९८१ साली तयार केले असा या विश्‍वस्त संस्थेच्या पदाधिकार्‍यांचा दावा होता.

या बनावट मृत्यूपत्रात हरिंदरसिंग यांच्या दोन मुलींना विश्‍वस्त संस्थेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष केलेले होते. त्या दोघींना दरमहा १२०० आणि १००० रुपये वेतन देण्याची तरतूद त्या बनावट मृत्यूपत्रात केलेली होती. त्याच्या आधारावर सारी संपत्ती हडप करण्याचा या विश्‍वस्तांचा डाव होता. हरिंदरसिंग यांना चार अपत्ये होती. त्यातला एक मुलगा आणि मुलगी मरण पावले असून दोन मुली हयात आहेत. त्यांनी या मृत्यूपत्राला आव्हान दिले आणि खटला जिंकून २० हजार कोटींची मालमत्ता मिळविली.

हरिंदरसिंग यांनी या विश्‍वस्त संस्थेला सारी संपत्ती दिल्याचे मृत्यूपत्र १९८१ साली तयार केले. असा विश्‍वस्तांचा दावा आहे. परंतु शासन दरबारी ही विश्‍वस्त संस्था १९८२ साली स्थापन झाली. असे नोंदलेले आहे. तेव्हा जी संस्था ८१ साली अस्तित्वातच नव्हती तिला हरिंदरसिंग आपली संपत्ती कशी देऊ शकतील असा प्रश्‍न उपस्थित झाला त्यामुळे न्यायालयाने हे मृत्यूपत्र बनावट असल्याचा निर्वाळा देऊन ३२ वर्षाचा खटला निकाली काढला.

Leave a Comment