हैदराबाद – ग्राम पंचायत निवडणुकांमध्ये फारसे यश न मिळवू शकल्यामुळे नैराश्याने घेरलेल्या वायएसआर कॉंग्रेस पक्षात तेलंगणाच्या मुद्यावरून उभी फूट पडली असून गेल्या काही महिन्यात सतत विजय मिळविणार्या या पक्षाला मोठा धक्का बसला आहे. वायएसआर कॉंग्रेस हा पक्ष रायलसीमा आणि तटवर्ती आंध्र प्रदेशात प्रभावी स्थान मिळवून आहे. त्यामुळे तेलंगणाच्या निर्मितीला विरोध करणार्या आमदारांचा या पक्षात वरचष्मा आहे.
तेलंगणातील काही नेत्यांनीही या पक्षात प्रवेश केलेला होता, परंतु या पक्षाचे नेते जगनमोहन रेड्डी आणि पक्षाच्या कार्याध्यक्ष वाय.एस. विजया यांनी अद्यापही तेलंगणाबाबतची भूमिका स्पष्ट केलेली नाही. त्यामुळे नाराज झालेल्या तेलंगणातील नेत्यांनी पक्षाचे राजीनामे दिले आहेत. माजी मंत्री कोंडा सुरेखा आणि माजी आमदार कोंडा मुरली त्याचबरोबर जिट्टा बाळकृष्ण आणि के.के. महेंद्र रेड्डी या तेलंगणातील नेत्यांनी वाय.एस. विजया यांच्याकडे तेलंगणाबाबतची भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली. पण त्यांनी ती स्पष्ट केली नाही.
तेलंगणाच्या निर्मितीला विरोध करून उर्वरित आंध्र प्रदेशातले आपले स्थान बळकट करण्याचा पक्षाचा हेतू आहे. मात्र त्यामुळे तेलंगणातील या पक्षाचे नेते नाराज झाले आहेत. येत्या काही दिवसांत या तेलंगणातील या पक्षाचे नामोनिशाण मिटून जाईल आणि वायएसआर कॉंग्रेस हा उर्वरित आंध्र प्रदेशापुरताच पक्ष म्हणूनच शिल्लक राहील, अशी चिन्हे दिसत आहेत.
कॉंग्रेस पक्षाचे उर्वरित आंध्र प्रदेशातले स्थान टिकावे यासाठी त्याही पक्षाच्या आमदारांनी तेलंगणाला विरोध सुरू केला आहे. त्यामुळे उर्वरित आंध्रात कॉंग्रेस आणि वायएसआर कॉंग्रेस हे दोन्ही पक्ष बळकट होतील. तेलुगू देशम पक्षाने मात्र सुरुवातीला तेलंगणाला विरोध आणि नंतर त्याला पाठींबा असे अस्थिर धोरण ठेवल्यामुळे या पक्षाचे दोन्ही भागातले स्थान डळमळीत झाल्याचे मानले जात आहे.