सोल – दक्षिण कोरियाच्या पॉस्को या पोलाद प्रकल्पात गुंतवणूक करणार्या भागधारकांमध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे. या कंपनीच्या भारतातील ओरिसा राज्यातील प्रकल्पाला होत असलेल्या विलंबामुळे कंपनीचा तोटा वाढत चालला आहे. त्यामुळे कंपनीचे भागधारक चिंता व्यक्त करत आहेत. ओरिसातील पॉस्कोच्या पोलाद प्रकल्पात १२ अब्ज डॉलर्स एवढी प्रचंड गुंतवणूक होणार होती आणि या प्रकल्पातून भरपूर नङ्गा अपेक्षित होता. परंतु भूमी अधिग्रहणाच्या मुद्यावरून हा प्रकल्प जवळपास १२ वर्षे रखडला आहे. त्यामुळे कंपनीच्या नफ्यावर गंभीर परिणाम झाला आहे.
पॉस्कोच्या गुंतवणूकदारांत अस्वस्थता
पॉस्को कंपनीने १२ वर्षांपूर्वी विस्ताराची योजना आखली. कारण कंपनी आपल्याच देशामध्ये तयार करत असलेले लोखंड देशातल्या गरजा पुरविण्यास अपुरे पडू लागले. या विस्ताराच्या योजनेचा एक भाग म्हणजे ओरिसातील प्रकल्प. मात्र हा प्रकल्प रखडला आणि कंपनीने आपल्या गरजा भागविण्यासाठी जगातल्या काही तोट्यात चाललेल्या पोलाद कंपन्या चालवायला घेतल्या. त्यात कंपनीची मोठी गुंतवणूक झाली.
ही गुंतवणूक व्हायला आणि पोलादाची मागणी कमी व्हायला एकच गाठ पडली. जगभरात तर पोलादाची मागणी कमी झालीच, पण अलीकडच्या काळात हे पोलादाचे सर्वाधिक मोठे ग्राहक म्हणून ज्या चीनकडे पाहिले जाते त्या चीनने सुद्धा पोलादाच्या वापरावर बंधने आणली. त्यामुळे कंपनीने मोठ्या उत्साहात चालवायला घेतलेले कारखाने तोट्यात गेले. दुसर्या बाजूला ओरिसातल्या प्रकल्पामध्ये प्रचंड पैसा अडकून पडला, त्याने कंपनी तोट्यात आली. कंपनीच्या भागधारकांना या वर्षीच्या लाभांशाविषयी चिंता वाटायला लागली आहे.