
भट्ट कॅम्पच्या र्मडर-३ या चित्रपटात आवश्यकतेपेक्षा जास्त अंगप्रदर्शन व भडक दृश्ये देऊनही आपल्या कारकीर्दीची दुकानदारी फारशी चालत नसल्याचे पाहून आदिती राव हैदरीने आता पुन्हा आपली प्रतिमा बदलण्याचा निर्णय घेतला आहे. विश्वास बसणार नाही, पण नाजूक बांध्याची आदिती आता अँक्शन भूमिका साकारण्याची इच्छा ठेवून असून त्यासाठी ती अशाच एखादी कथा व चित्रपटाचा शोध घेत आहे. राकेश ओमप्रकाशच्या एका चित्रपटात साध्यासरळ तरुणीची भूमिका साकारत आदितीने आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली होती. मात्र त्यास फारसे यश न मिळाल्याने आपली प्रतिमा बदलण्याचा निर्णय घेत सुधीर मिश्राच्या यह साली है जिंदगी या चित्रपटात ती अतिशय ग्लॅमरस व बोल्ड रूपात प्रेक्षकांसमोर आली होती. या चित्रपटाचा नायक अरुणोदय सिंहसोबत तिने बेसुमार चुंबनदृश्ये दिली होती, पण हा चित्रपटही बॉक्स ऑफिसवर दणकून आपटला.