
सिंगापूर दि.२७ – भारतीयांना जशी चिनी आणि थाई फूडची लज्जत समजली आहे तशीच सिंगापूर मधील बिगर भारतीयांच्या जिभेलाही भारतीय खाद्यपदार्थांनी चांगलेच चाळविले असल्याचे येथे भरविण्यात आलेल्या खाद्यपदार्थ महोत्सवात दिसून आले आहे. सिंगापूरमध्ये भारतीय खाद्यपदार्थ पुरविणारी सुमारे ३५० हॉटेल्स असून येथे १९ जुलै ते २८ जुलै दरम्यान भारतीय खाद्यपदार्थ महोत्सव भरविला गेला आहे.
मसालेदार, चटकदार आणि झणझणीत भारतीय पदार्थानी सिंगापूर वासिय पुरते वेडावले असून या काळात येथील भारतीय हॉटेल्स गर्दीने अक्षरशः तुडुंब भरली असल्याचे चित्र दिसत आहे. अमेरिकन लोकांनाही भारतीय खाद्यपदार्थांनी अशीच भुरळ घातली आहे. आता सिगापूरवासीही भारतीय पदार्थांच्या प्रेमात पडले आहेत असे भारतीय हॉटेल व्यावसायिक असोसिएशनचे महोत्सव प्रमुख विमल राय यांनी सांगितले.
राय यांनी दिलेल्या माहितीनुसार सिंगापूरात घरी स्वयंपाक करून खाणार्यांचे प्रमाण हाताच्या बोटावर मोजण्याएवढेच आहे. येथील ७० ते ८० टक्के जनता दररोज रेस्टॉरंट, फूड कोर्ट येथेच खात असतात. त्यात अगदी शालेय विद्यार्थ्यांपासून वृद्धांपर्यंत सर्वांचा समावेश असतो. मात्र भारतीय खाद्यमहोत्सवात येत असलेल्या एकूण ग्राहकांत ९० टक्के लोक बिगर भारतीय आहेत आणि हेच या महोत्वसाचे यश म्हणावे लागेल.