फिमेल मॅनेक्विन वर पुण्यातही बंदी?

पुणे दि.२७- मुंबईतील फूटपाथवर अंतर्वस्त्रे घातलेले स्त्री पुतळे अथवा फॅशन सादर करणारे मॅनिक्वीन मांडले जात असल्याच्या पार्श्वभूमीवर महिन्यापूर्वी शिवसेनेने आक्षेप घेऊन दंगा केला होता. या घटनेची पुनरावृत्ती आता पुण्यातही होऊ पाहात असल्याचे वृत्त आहे. महापालिका नगरसेवकांच्या नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत शिवसेनेचे नेते अशोक हरणवाल यांनी हा मुद्दा मांडला असून पुण्यातील बाजारपेठांत अशा प्रकारचे अश्लील पुतळे रस्त्यातून मांडण्यावर बंदी घालण्याची मागणी केली आहे.

पुण्यातील सर्वाधिक महत्त्वाच्या लक्ष्मी रस्यावरील दुकांनांतून जाहिरातीसाठी असले पुतळे रस्त्यावर मांडले जाऊ नयेत अशा सूचना दुकानदारांना दिल्या असल्याचेही वृत्त आहे. एकतर असे पुतळे मांडून स्त्री देहाचे प्रदर्शन करणे हे भारतीय संस्कृतीच्या विरोधात आहेच पण त्यामुळे नित्तिमत्ता ढासळण्यासही प्रोत्साहन मिळते असे शिवसेनेचे म्हणणे आहे. सध्या पुण्यातील दुकानदारांना असले पुतळे दुकानाच्या आतच ठेवण्याच्या सूचना दिल्या गेल्या आहेत मात्र लवकरच त्यासंबंधी ठोस योजना आखली जाणार असून असले पुतळे मांडण्यास बंदीच केली जाईल असेही सांगितले जात आहे.

Leave a Comment