पश्चिम महाराष्ट्रातील धरणे पंचाऐंशी टक्के भरली- महापुराची भीती

पुणे,दि.27:पश्चिम महाराष्ट्रातील धरणे पंचाऐंशी टक्के भरूनही अजून पाउस थांबलेला नाही, दुसर्‍या बाजूला कर्नाटकातही गेले दहा दिवस पाउस पडतो आहे, त्यामुळे आठ वर्षापूर्वी कृष्णानदीचा पूर व आलमट्टी धरणाचा फुगवटा यांचा परिमाण होवून सांगलीतील राजवाडा चौकात चार दिवसपर्यंत चार फूट पाणी होते. त्या पुरात सांगली शहर ऐंशी टक्के आठ दिवस पाण्याखाली होते. अजून दोन दिवस पाउस राहिल्यास तशीच स्थिती निर्माण होईल काय अशी चिंता महाराष्ट्र व कर्नाटक या राज्यांच्या समोर उभी राहिली आहे. सध्या महाराष्ट्रातून कर्नाटकात जाताना कृष्णानदीचा विसर्ग दोन लाख क्यूसेक्स आहे तर अलमट्टीधरणातून अडीच लाखाचा क्युसेक्स विसर्ग आहे.

ˆपश्चिम महाराष्ट्रात गेले पंधरा दिवस सतत पाऊस पडत असल्याने या भागातील सर्व धरणे पंचाऐशी टक्के भरली आहेत. प्रामुख्याने पुणे जिल्हा, सांगली जिल्हा व कोल्हापूर जिल्हा येथून वाहणार्‍या नद्यातून एकूण पावणेदोन लाख क्यूसेक्स पाणी सोडण्यात आले आहे.पुणे जिल्ह्यातील धरणेही पंचाऐंशी टक्के भरली आहेत. पानशेत, खडकवासला, मुळशी सार्‍या धरणातून जाणारे पाणी पुढे सोलापूर जिल्ह्याच्या पुण्याच्या बाजूने सीमेवर असणार्‍या उजनी धरणात सध्या साठ हजार क्यूसेक्स येवढा विसर्ग सुरु आहे. त्यामुळे पन्नास टक्के मृत साठा ओलांडून धरणात वीस टक्के पाणी साठा झाला आहे. पुणे, पिंपरीचिंचवड शहरातून वाहणार्‍या नद्या दुथडी भरून वाहात आहेत.

पश्चिम महाराष्ट्रात पन्नास दिवसापूर्वीपर्यंत अभूतपूर्व दुष्काळी स्थिती होती. पिण्याचे पाणी व जनावरांचा चारा यांची स्थिती गंभीर होती. खेडेगावात रोजगाराचे साधन उपलब्ध नसल्याने फार मोठ्या प्रमाणावर स्थलांतर सुरु झाले होते. पण गेल्या पन्नास दिवसात पावसाने मान्सूनची सरासरी पंचाहत्तर टक्के गाठली आहे. पुणे शहरातील मुठानदीतून सध्या बारा हजार क्युसेक्स पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे शहरातील बाबा भिडे या सांडवा पुलाला पाणी लागले आहे. पानशेत धरण दहा. पासष्ट टीएमसी क्षमता असलेल्या पानशेत धरणात दहा चाळीस येवढी क्षमता भरली आहे. वरसगाव धरणातही बारा.ब्याऐशी क्षमता असलेल्या ठिकाणी साडेअकरा टीएमसी पाणी भरले आहे.

सातारा जिल्ह्यात कोयना धरणाची क्षमता एकशे पाच टीएसमी आहे. तर जिल्ह्यातील धोम, कण्हेर, उरमोडी वगैरे मिळून धरणाची क्षमता अठ्ठेचाळीस टीएमसी आहे. ही सारी धरणे पंचाऐशी टक्के भरली आहेत. सातारा जिल्ह्यातून सांगली जिल्ह्यात जाणारा कृष्णेती विसर्ग हा ऐंशी हजार क्युसेक्स आहे तर सांगली जिल्ह्यात कृष्णेला कोल्हापूर जिल्ह्यातून येणारा पंचगंगा वगैरे नदीतील विसर्ग पासष्ट हजार क्युसेक्स आहे. त्यात सांगली जिल्ह्यातील पावसाचा जवळ जवळ चाळीस हजार क्युसेक्स आहे त्यामुळे सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातून कर्नाटकात जाणार्‍या कृष्णेचा विसर्ग जवळ जवळ पावणे दोन ते दोन लाख क्युसेक्स झाला आहे. कर्नाटकातही गेले दहा दिवस जोराचा पाऊस पडत आहे. महाराष्ट्राच्या सीमेपासून पन्नास किमीवर असणार्‍या अलमट्टी धरणाचा पाणीफुगवटा ते भरले असताना अगदी दहा किमीवर येतो. पण जेंव्हा सर्वत्र पाऊस पडतो तेंव्हा तो महाराष्ट्रातही आत वीस पंचवीस किमीवर तो फुगवटा पोहोचतो ही शक्यता लक्षात घेउन महाराष्ट्रातून कर्नाटकात जाणार्‍या दोन लक्ष क्यूसेक्स विसर्गाच्या ठिकाणी अलमट्टी धरणातून अडीच लाख विसर्ग ठेवला आहे. पाऊस जर असाच सुरु राहिला तर मात्र सांगली व कोल्हापूर जिल्ह्यात आणिबाणीची स्थिती निर्माण होवू शकते, अशी शक्यता व्यक्त होत आहे.

छायाचित्र ˆ- पुणे शहरातील मुठानदीवरील बाबाभिडे सांडव्याला पुराचे पाणी पोहोचले होते.

Leave a Comment