पर्यावरण रक्षणासाठी सचिनची बॅटिंग

गुडगाव – विश्‍वविक्रमी क्रिकेटवीर सचिन तेंडुलकर याने आपल्या चाहत्यांना नैसर्गिक संसाधनांची उधळपट्टी न करण्याचे आणि पर्यावरण रक्षणाचे प्रयत्न वेगवान करण्याचे आवाहन केले आहे. तोशिबा कंपनीने गुडगाव येथून आपल्या पर्यावरण रक्षणाच्या मोहिमेला सुरूवात केली आहे. या मोहिमेच्या उद्घाटन समारंभात सचिन सहभागी झाला होता. या प्रसंगी भाषण करताना त्याने पर्यावरणासाठी अशी बॅटिंग केली.

सर्व सामान्य माणसाच्या छोट्या छोट्या प्रयत्नांनीच पर्यावरणाचे रक्षण होत असते. तेव्हा आपल्या एका प्रयत्नाने काय होणार आहे असा नकारार्थी विचार करता कामा नये. आपण छोटी छोटी पावले प्रदीर्घ काळ टाकत राहिलो तरच पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीने काहीतरी निर्णायक असे घडणार आहे. कोणताही बदल एका रात्रीतून होत नसतो. असे सचिन तेंडुलकरने आवाहन केले.

आपल्याला निरोगी रहायचे असेल तर आपली पृथ्वीसुध्दा निरोगी राहिली पाहिजे. आम्ही जेव्हा मैदानावर चांगला खेळ करतो तेव्हा आम्हाला मैदानाच्या बाहेर बरेच प्रयत्न करावे लागतात. तसे प्रयत्न केल्याशिवाय ङ्गरक जाणवत नाही. तसेच प्रयत्न पर्यावरणासाठी केले पाहिजेत असे सचिनने प्रतिपादन केले. गुडगावच्या शाळांसाठी आयोजित करण्यात आलेल्या रंगभरण स्पर्धेचे पारितोषिक वितरणही त्याच्या हस्ते करण्यात आले. अशा स्पर्धांमधून गरीब विद्यार्थ्यांसाठी पैसा उभा करणे शक्य आहे असेही सचिन तेंडुलकर याने स्पष्ट केले.

Leave a Comment