झोपेच्या सवयीवर चंद्राचा परिणाम

moon
न्यूर्यार्क – माणसाच्या वर्तणुकीवर आणि भवितव्यावर चंद्राचा काही परिणाम होतो की नाही आणि अशा परिणामाचा दावा करणारे ज्योतिष शास्त्र हे खरे आहे की खोटे याचा निकाल अजून लागलेला नाही. परंतु अमेरिकेत करण्यात आलेल्या काही पाहण्यांमध्ये माणसाच्या झोपेवर चंद्राचा परिणाम होतो असे दिसून आले आहे. पौर्णिमा जसजशी जवळ येत जाईल तसतशी माणसाची झोप कमी होते असे या पाहण्या करणार्‍या तज्ज्ञांना आढळले आहे.

बरेच लोक पौर्णिमेच्या जवळपास शांत झोप लागत नाही अशी तक्रार करतात. अमेरिकेतल्या अनेक डॉक्टरांकडे तशा तक्रारी आल्यावरून अशा तक्रारींचा छडा लावण्याचा निर्णय त्यांनी घेतला. तेव्हा काही लोक पौर्णिमे दिवशी नेहमीपेक्षा २० मिनिटे कमी झोपतात असे त्यांना दिसले. याचा अर्थ आपल्याला चांगली झोप यावी म्हणून कितीही सुख सुविधा निर्माण करण्यात आल्या असल्या तरी आपली झोप ही चंद्राच्या आवर्तनावर अवलंबून असते.

चंद्राचा ज्यांच्या झोपेवर परिणाम होतो त्यांनी चंद्र पाहिलेला नसला तरीही चालते. चंद्र पाहिलेला असो की नसो त्याच्या पूर्ण अवस्थेचा परिणाम झोपेवर होतोच. कारण पौर्णिमे दिवशी गाढ झोप घेण्याची क्षमता असलेले मेंदूचे केंद्र काहीसे विचलित झालेले असते. आपल्या शरीरामधील मेलॅटोनीन हे हार्मोन आपल्या झोपेचे घड्याळ व्यवस्थित चालू ठेवत असते. परंतु पौर्णिमे दिवशी शरीरातल्या मेलॅटोनीनचे प्रमाण कमी होते. म्हणून झोपेत अडथळा येतो. म्हणजेच आपली वर्तणूक आणि झोप यावर चंद्राचा प्रभाव आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment