मोदीच गुजरात दंगलीला जबाबदार – गोविंदाचार्य

नवी दिल्ली – गुजरात दंगलीच्या मुद्यावरून विरोधकांकडून रोजच्या रोज टीकेचे वार झेलणार्‍या नरेंद्र मोदी यांच्यावर आता कधीकाळी भाजपचे मथिंक टँक असलेले हिंदुत्ववादी नेते गोविंदाचार्य यांनी निशाणा साधला आहे. गुजरात दंगलींची नैतिक जबाबदारी मोदी यांचीच असून त्यांनी ती घ्यायला हवी, असे मत गोविंदाचार्य यांनी मांडले आहे.

बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. मगुजरात दंगल ही गोध्रा हत्याकांडाची प्रतिक्रिया आहे असं सांगणं चुकीचं आहे. हा युक्तिवाद करून दंगलीच्या जबाबदारीपासून पळ काढता येणार नाही. एकतर दोन्ही घटना चुकीच्या किंवा दोन्ही घटना योग्य असं मानलं पाहिजे. दंगलीच्या काळात सरकारने सक्रीय राहून राजधर्म पाळला नव्हता, हेच वास्तव आहे,फ असं गोविंदाचार्यांनी म्हटलं आहे

ते पुढे म्हणाले, मनिवडणुकीतील विजय एखाद्या व्यक्तीला बरोबर किंवा चुकीचा ठरवू शकत नाही. तो योग्यायोग्यतेचा निकष असू शकत नाही. तसं ठरवायचं झालं तर चारा घोटाळ्यासाठी लालूप्रसाद यादव यांना दोष देणं चुकीचं आहे. कारण या घोटाळ्यानंतरही बिहारच्या निवडणुकांमध्ये त्यांनी विजय मिळवला होता. गोविंदाचार्य यांनी यापूर्वी अटलबिहारी वाजपेयी यांना भाजपचा मुखवटा म्हणून हिणवले होते. त्यानंतर गोविंदाचार्यांना भाजप सोडावा लागला. तेव्हापासून गेली 12 वर्षे ते राजकीय वनवासात असून मराष्ट्रीय स्वाभिमान आंदोलन चालवतात.

मोदींना आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करतानाच एकेकाळी संघ स्वयंसेवक असलेल्या गोविंदाचार्य यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरही शरसंधान केले. संघ राजकारणापासून अलिप्त नसल्याचे गोविंदाचार्य म्हणाले. संघाने नरेंद्र मोदी यांचा राज्याभिषेक केला आहे, असे कोणतेही वक्तव्य सरसंघचालक किंवा संघातील अन्य कोणत्याही अधिकारी व्यक्तीने केलेले नाही. मात्र, म्हणून संघाचा राजकारणाशी संबंधच नाही, असे म्हणणे चुकीचे आहे, असे त्यांनी सांगितले.

Leave a Comment