चिन्यांची दूध पावडर खरेदी

हाँगकाँग दि.२६ – चीनमधील लहान मुलांचे पालक सध्या जेथे जातील तेथे लहान मुलांसाठी वापरल्या जाणार्‍या दूध पावडरची खरेदी करत सुटले असल्याने नेदरलँडपासून ते न्यूझीलंड पर्यंतच्या सहा देशात मुलांसाठीच्या दूध पावडरची टंचाई जाणवू लागली असल्याचे समजते. परिणामी हाँगकाँग सह अनेक देशांनी देशाबाहेर जाताना ही दूध पावडर नेण्याबाबत प्रवाशांवर निर्बंध लागू केले आहेत. इतकेच नव्हे तर नियमाचे उल्लंघन करणार्यांपना तुरूंगवास आणि दंडाची शिक्षाही ठोठावली जात आहे.

या विषयी मिळालेल्या माहितीनुसार २००८ साली चीनमध्ये भेसळ युक्त दुध पाजल्यामुळे सहा मुले मृत्युमुखी पडली होती तर तब्बल ३ लाख मुले आजारी झाली होती. त्यामुळे चीनमध्ये उत्पादित होत असलेले दूध अथवा दुधाची पावडर खरेदी करण्यास तेथील पालक तयार नाहीत. मुलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने परदेशी दूध पावडरीलाच ते प्राधान्य देत आहेत आणि जगात जेथे जातील तेथून अन्य परदेशी वस्तूंप्रमाणेच लहान मुलांसाठीची दूध पावडर डबेही खरेदी करत आहेत. स्वतःस जाणे शक्य नसल्यास मित्र, नातेवाईकांनाही दूध पावडरचे डबे आणावयास सांगत आहेत असे समजते.

चीनी पालकांच्या या दूध पावडर खरेदी मॅनियाने ब्रिटनमधील दोन मुख्य रिटेल दुकाने बूटस व सॅनबरी येथे दूध पावडरची टंचाई जाणवू लागली आहे. हाँगकाँगमधील कस्टम अधिकार्‍यांनी तर पत्रकार परिषद घेऊनच येथून बाहेर पडणार्‍या प्रवाशांना दोन पेक्षा अधिक दूध डबे बरोबर नेता येणार नाहीत असे जाहीर केले आहे व नियम मोडल्यास ६५०० डॉलर्सपर्यंत दंड व दोन वर्षे तुरूंगवास अशा शिक्षेची तरतूद केली असल्याचेही जाहीर केले आहे.

अनेक देश असे डबे देशाबाहेर नेणार्‍या प्रवाशांना स्मगलर सारखी वागणूक देत असल्याचेही समजते. र्हांगकाँगने हा गुन्हा केल्याप्रकरणी दोन दिवसांत १० जणांना अटकही केली असून २०० पौंड वजनाची दूध पावडर जप्त केली आहे. त्याची बाजारातील किमत ३५०० डॉलर्स इतकी आहे. चीनी पालकांकडून मिळालेल्या माहितीनुसार ही परदेशी पावडर चीनमध्ये मिळते पण ती फार महाग पडते.

प्यु रिसर्च सेंटरने केलेल्या सर्वेक्षणानुसार चीनमधील अन्न सुरक्षा गंभीर असल्याचे मत ४१ टक्के पालकांनी व्यक्त केले आहे. अनेक महिला स्तनपानावर अधिक भर देत आहेत मात्र तरीही दूध पावडरची गरज भासतेच. लहान मुले असलेल्या पालकांपैकी २/३ पालक दूध पावडरचा वापर करतात व त्यातही परदेशी दूध पावडर वापरणार्‍याचे प्रमाण ६० टक्के आहे. परिणामी ही परदेशी पावडरही ३० टक्कयांनी महाग झाली आहे.

Leave a Comment