इंद्रायणीतील ’तवेरा’ बाहेर, पण प्रवासी बेपत्ताच

पुणे – पुण्याजवळील आळंदीत वाहतुकीसाठी नव्याने बांधण्यात आलेल्या पुलाचा कठडा तोडून चार दिवसांपूर्वी इंद्रायणी नदीपात्रात पडलेल्या तवेरा गाडीला आज (शुक्रवार) अथक प्रयत्नांनंतर नदीबाहेर काढण्यात मदत यंत्रणांना यश आले, पण दुर्दैवाने या गाडीत प्रवास करणारे सचिन लहाने आणि संदीप जोगदंड या दोन्ही तरुणांचा अद्याप शोध लागू शकला नाही.

नदी पात्रातून गाडी वर निघताच या तरुणाच्या कुटूंबीयांनी टाहो फोडला, गाडीसह पाण्यात पडलेले हे दोन तरुण खूप लांब वाहत गेल्याची भीती तपास अधिकार्‍यांनी व्यक्त केली असून त्यांच्या शोधासाठी युध्दपातळीवर प्रयत्न केले जाणार असल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले आहे. अत्यंत दुर्दैवी अशा या घटनेमुळ पुणे परिसरात सर्वत्र हळ-हळ व्यक्त होत आहे. तसेच बांधकाम पूर्णत्वाचा दाखला नसतानाही इंद्रायणी नदी पत्रावरील हा पूल रहदारीसाठी
खुला केल्या गेल्याचा आरोप शिवसेनेचे खासदार शिवाजीराव अढळराव यांनी केला होता, त्यानुसार आता या घटनेची चौकशी केली जाणार आहे. तर यामध्ये दोषी
असलेल्या ठेकेदार अधिकार्‍यांवर कोणती कारवाई होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Comment