भाजपवर नितीश कुमारांची टीका

पाटणा – नोबेल पुरस्कार विजेते अमर्त्य सेन यांचा भारतरत्न पुरस्कार काढून घेण्याची भाजप खासदार चंदन मित्रा यांच्या मागणीवर जदयू नेते आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी कठोर शब्दात टीका केली आहे. चंदन मित्रा यांची मागणी हे भाजपचे असहिष्णूतेचे लक्षण आहे. भाजपचे नवे नेतृत्व लोकशाही विरोधी विचारांना प्रोत्साहन देत आहे अशा शब्दात नितीश यांनी मोदींचे नाव न घेता टीका केली. जर तुम्ही आमच्याशी सहमत नसाल तर, आम्ही तुम्हाला सहन करणार नाही. नव्या नेतृत्वाची विचार करण्याची ही नवी पध्दत आहे अशा बोच-या शब्दात नितीश कुमार यांनी टीका केली.

भारतीय संविधान आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यांच्या मूलभूत अधिकाराबद्दल नव्या नेतृत्वाला फारसा आदर नसल्याचे यातून स्पष्ट झाले आहे असे कुमार म्हणाले. भाजप बरोबरची आपली सतरा वर्षांपासूनची युती तोडण्याचा निर्णय योग्यच असल्याचा पुनरुच्चार कुमार यांनी यावेळी केला. देशाला लोकशाही हवी आहे पण ती संपुष्टात आणण्याचे काही जण स्वप्न पहात आहेत असे नितीश म्हणाले.

Leave a Comment