फारूख अब्दुला उवाच, 1 रुपयांत जेवण

नवी दिल्ली – भारतातील गरिबीची जणू थट्टाच चालली आहे. कोणी 12 रुपये, कोणी 5 रुपये तर आता केंद्रीय मंत्री फारुख अब्दुल्ला यांनी चक्क 1 रुपयांत जेवण मिळू शकते असे वक्तव्य केले आहे. देशात सध्या जेवण स्वस्त झाले आहे. त्यामुळे गरिबांना जेवणावळी उठविण्यास हरकत नाही, अशी उपरोधिक चेष्टी काँग्रेस नेत्यांनी चालविल्याचे दिसून येत आहे. 1 रूपयांत पोटभर जेवू शकता, असे धक्कादायक व्यक्तव्य करत केंद्रीय मंत्री फारूख अब्दुला यांनी राज बब्बर यांच्यावर कढी केलेय.

काँग्रेसचे प्रवक्ते आणि अभिनेते राज बब्बर यांनी गुरुवारी मुंबईत 12 तर दिल्लीमध्ये 5 रुपयांमध्ये भरपूर जेवण मिळू शकते असे वक्तव्य केले होते. त्यामुळे सरकारच्या गरिबी कमी झाल्याच्या दाव्यावरून सरकार आणि विरोधकांमध्ये वादंग उठले. हे वादळ क्षमायचे नाव घेत नाही. वादळ शांत झालेले नसताना केंद्रीय मंत्री फारुख अब्दुल्ला यांनीही त्यात तेल ओतले आहे. फारुख अब्दुल्ला म्हणतात, तुम्ही जर ठरवले तर एक रुपयांमध्येही पोटभर जेवण करू शकता किंवा शंभर रुपयांमध्येही. त्यांच्या या अजब वक्तव्यावरून वादंग निर्माण होण्याची शक्यता आहे. बेधड वक्तव्य करून ते एवढ्यावर न थांबता गरिबांचे जीवन बदलण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. गरिबांना चांगले जेवण मिळाले तरच भारताची परिस्थिती बदलू शकेल, असे ते म्हणालेत.

देशातील कमी किंमतीच्या जेवणावळीवरून भारतीय जनता पक्षाचे नेते वरुण गांधी यांनी टीका केली आहे. बारा रुपयांमध्ये जेवण मिळण्याचे एकमेव ठिकाण आहे, ते म्हणजे संसदेचे कॅन्टीन. तर सरकार गरीब नागरिकांची चेष्टा करत आहे. मुंबईमध्ये बारा रुपयांत चहा किंवा वडापावसुद्धा मिळत नाही, असे शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले.

Leave a Comment