पाकमधील झरदारींच्या पक्षाचा अध्यक्षपदाच्या निवडणुकीवर बहिष्कार

इस्लामाबाद, दि. 26 – पाकिस्तानमध्ये पुढील आठवड्यात अध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. विद्यमान अध्यक्ष असिफ अली झरदारी यांच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान पीपल्स पार्टीने (पीपीपी) या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याची घोषणा केली आहे. निवडणूक कार्यक्रमातील बदलाचा निषेध करण्यासाठी पीपीपीने हे पाऊल उचलले आहे.

झरदारी यांचा उत्तराधिकारी निवडण्यासाठी सुरुवातीला अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी 6 ऑगस्ट हा दिवस निश्‍चित करण्यात आला. मात्र, रमजान महिन्याचा अतिशय पवित्र मानला गेलेला 27 वा दिवस 6 ऑगस्टलाच येतो. त्यामुळे निवडणुकीची तारीख बदलावी, अशी विनंती पाकिस्तानमधील सत्तारूढ पीएमएल-एन या पक्षाकडून करण्यात आली होती. ही विनंती मान्य करत सर्वोच्च न्यायालयाने निवडणुकीसाठी 30 जुलै हा दिवस निश्‍चित केला. निवडणूक आधीच घेण्याच्या निर्णयामुळे प्रचारासाठी खूपच कमी कालावधी लागणार आहे. निवडणूक आधीच घेण्याच्या निर्णयाचा निषेध करण्यासाठी आम्ही बहिष्कार टाकण्याचे ठरवले, असे पीपीपीचे अध्यक्षपदाचे उमेदवार रझा रब्बानी यांनी सांगितले. अर्थात, पीपीपीच्या बहिष्कारामुळे अध्यक्षपदाच्या निवडणूक निकालावर कुठलाही परिणाम होणार नाही. या निवडणुकीत पीएमएल-एनचे उमेदवार मम्नून हुसैन सहज बाजी मारतील, हे जवळपास निश्‍चित आहे.

Leave a Comment