आंध्रातील वायएसआर काँग्रेसच्या 16 आमदारांचा राजीनामा

हैदराबाद, दि. 26 – आंध्रचे विभाजन करून स्वतंत्र तेलंगण राज्याची निर्मिती करण्यात यावी, ही मागणी प्रदीर्घ काळापासून प्रलंबित आहे. एकीकडे स्वतंत्र तेलंगण राज्याची निर्मिती करण्याच्या मागणीने जोर धरला असतानाच; दुसरीकडे आंध्र प्रदेशचे विभाजन केले जाऊ नये यासाठी वायएसआर काँग्रेस पक्षाचे नेते आक्रमक झाले आहेत. या पक्षाच्या 16 आमदारांनी संयुक्त आंध्र प्रदेशचे समर्थन करण्यासाठी राजीनामा दिला आहे. केंद्रात आणि आंध्रात सत्तेवर असलेल्या काँग्रेसच्या एका आमदारानेही याच कारणावरून राजीनामा दिला आहे.

आंध्रचे विभाजन करून स्वतंत्र तेलंगण राज्याची निर्मिती करण्यात यावी, ही मागणी प्रदीर्घ काळापासून प्रलंबित आहे. या मागणीला अनुकूल असा निर्णय घेण्याच्या दिशेने काँग्रेसमध्ये हालचाली सुरू असल्याचे वृत्त आहे. या पार्श्‍वभूमीवर, संयुक्त आंध्रचे समर्थकही आक्रमक झाले आहेत. वायएसआर काँग्रेसच्या विधानसभेतील नेत्या वाय. एस. विजयाम्मा वगळता उर्वरित सर्व 16 आमदारांनी राजीनाम्याचे पाऊल उचलले आहे. आंध्रच्या विभाजनाला विरोध दर्शवण्यासाठी ही कृती केल्याची प्रतिक्रिया या आमदारांनी दिली आहे. तेलंगणबाबत निर्णय घेताना काँग्रेस स्वत:च्या राजकीय भवितव्याचीच अधिक चिंता करत आहे, असा आरोप करून त्यांनी कुठलाही निर्णय घेण्यापूर्वी काँग्रेसने इतर पक्षांशी सल्लामसलत करावी, अशी मागणी केली आहे. या आमदारांनी वैयक्तिक पातळीवर राजीनामे दिल्याचे म्हटले आहे.

राजीनामा देणारे वायएसआर काँग्रेसचे सर्व आमदार तेलंगणबाहेरील आहेत. काँग्रेसचे आमदार जी. वीरशिवा रेड्डी यांनीही संयुक्त आंध्रसाठी पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी पक्षालाही रामराम ठोकला आहे. अर्थात, आंध्र विधानसभा निवडणूक वर्षभरापेक्षाही कमी कालावधीवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे विधानसभा सभापतींकडून आमदारांचे राजीनामे स्वीकारले जाण्याची शक्यता कमीच असल्याचे मानले जात आहे. दरम्यान, वायएसआर काँग्रेसच्या आमदारांनी वैयक्तिक पातळीवर दिलेल्या राजीनाम्याची कृती म्हणजे निव्वळ राजकीय संधिसाधूपणा आहे. प्रथम वायएसआर काँग्रेस पक्षाने तेलंगणबाबत स्वत:ची भूमिका जाहीर करावी, अशी प्रतिक्रिया काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बोत्सा सत्यनारायण यांनी दिली आहे.

Leave a Comment