मारूती, होंडा, टोयोटाच्या गाड्या स्वस्त होणार

नवी दिल्ली दि.२५ -सेंट्रल बोर्ड ऑफ एक्साईज अॅन्ड कस्टमने जारी केलेल्या नव्या नोटीफिकेशननुसार मारूती एसएक्स फोर, होंडाची सिव्हिक आणि टोयोटाची करोला या गाड्यांना एसयूव्ही (स्पोर्टस युटिलिटी व्हेईकल) म्हणून मान्यता दिली गेली आहे. परिणामी या सेदान श्रेणीतील गाड्यावर आकारली जाणारी ३० टक्के ड्यूटी आता २७ टक्क्यावर येणार आहे. त्यामुळे या गाड्यांच्या किमती उतरणार असल्याचे सांगितले जात आहे.

या तिन्ही मॉडेलवर लकझरी कार सेगमेंटमधील गाड्या म्हणून १ मार्चपासून ३० टक्के ड्यूटी आकारली जात होती. त्याचा विपरित परिणाम गाड्यांच्या खपावर झाला होता. सरकारने १५०० सीसी इंजिन, ४००० मिमि लांबी व १७० मिमि पेक्षा अधिक ग्राऊंड क्लिअरन्स असणार्‍या गाड्या सेदान श्रेणीत घातल्या होत्या. मात्र आता त्यांना एसयूव्ही कार म्हणून मान्यता दिली गेली आहे.

टोयोटा किलोस्करचे अध्यक्ष शेखर विश्वनाथन यांनी सरकारच्या या निर्णयाचे स्वागत करतानाच अर्थमंत्रालयाकडून स्पष्टीकरण मागविले असल्याचे सांगितले. ते म्हणाले की ड्यूटी २७ टक्कयावर आली तर आम्हाला समाधानच वाटेल. गेले कांही दिवस ड्यूटीचे स्पष्टीकरण न झाल्यामुळे वितरक आणि ग्राहक यांच्यात गोंधळाचे वातावरण होते. ड्यूटी कमी झाली तर गाड्यांच्या किंमतीही नक्कीच कमी होतील.

Leave a Comment