नर्गिसने दाखविली स्टंटबाजी

बरेच दिवस बेकारीत घालविल्यानंतर ‘मद्रास कॅफे’ या चित्रपटात वर्णी लागल्यामुळे रॉकस्टारगर्ल नर्गिस फाखरीचा उत्साह सध्या ओसंडून वाहत आहे. एकही निर्माता विचारत नसल्याने गेली दोन वर्षे घरीच बसून असलेली नर्गिस मद्रास कॅफेमधील आपल्या भूमिकेला शंभर टक्के न्याय देण्यासाठी प्रचंड मेहनत घेत आहे. त्यासाठी जोखीम उचलण्याचीही तयारी दाखवत आहे.

या चित्रपटात तिच्या वाट्याला काही अँक्शनदृश्ये आहेत. मात्र त्यासाठी बॉडी डबल म्हणजे डुप्लिकेटची मदत घेण्याऐवजी तिने स्वत:च त्यांचे चित्रण केले. सूत्रांच्या माहितीनुसार, मद्रास कॅफेमध्ये नर्गिस एका खास भूमिकेत दिसणार आहे. हे पात्र पडद्यावर वास्तवपणे साकारण्यासाठी ती जीवतोड मेहनत घेत आहे. दुसरीकडे या चित्रपटात अँक्शनची रेलचेल असल्याने तिला त्यामध्ये अनेक साहसीदृश्ये द्यावी लागणार आहेत. हल्ली चित्रित झालेल्या एका दृश्यात नर्गिसला खोल पाण्यात उतरून चालायचे होते. या दृश्यासाठी दिग्दर्शकाने डुप्लिकेटची मदत घेण्याचा निर्णय घेतला होता, पण नर्गिसला ते मान्य झाले नाही. ही साहसीदृश्ये आपण इतरांकडून नाही तर स्वत:च चित्रित करणार असल्याचे तिने जाहीर केले. ही दृश्ये तिला झेपणार नाही, असेच सगळ्य़ांना वाटत होते, पण ती मात्र आपल्या निर्णयावर ठाम होती. या दृश्यासाठी तिने मोठी हिंमत दाखविली आणि आपला सवरेत्तम परफॉर्मन्स देत ते फत्तेही केले. रिकामे बसणे किती त्रासदायक असते याचा नर्गिसला चांगलाच अनुभव आहे. त्यामुळे बर्‍याच प्रतीक्षेनंतर भेटलेल्या या चित्रपटाबाबत अजिबातही कसर ठेवण्यास ती तयार नाही. मद्रास कॅफेत नर्गिस जॉन अब्राहमच्या नायिकेच्या भूमिकेत दिसणार आहे.

Leave a Comment