घोडे अडले कुठे?

नामवंत उद्योगपती शंतनुराव किर्लोस्कर यांना एका पत्रकाराने प्रश्‍न विचारला होता की देशाचा विकास नेमका कशाने होईल, मार्क्सवादाने की भांडवलवादाने?
त्यावर शंतनुरावांनी उत्तर दिले होते, देशाचा विकास श्रमवादाने होईल. तुम्ही कोणतीही विचारसरणी आणली तरी जोपर्यंत तुम्ही कष्ट करत तोपर्यंत देशाचा विकास होणार नाही. आता पुन्हा एकदा आपण अशाच प्रश्‍नाच्या तिढ्यावर उभे आहोत. समाजवादाने आपली प्रगती झाली नाही म्हणून आपण १९९१ साली मुक्त अर्थव्यवस्थेचा स्वीकार केला. ही अर्थव्यवस्था स्वीकारली की आपला विकास होईल अशी आशा सरकारने दाखविलीस पण तिच्यानेही आपला विकास झालेला नाही. आता असे म्हणण्याची वेळ आलेली आहे की देशाचा विकास समाजवादानेही होणार नाही आणि मुक्त अर्थव्यवस्थेनेही होणार नाही. आपला विकास भ्रष्टाचार मुक्त कारभाराने होणार आहे. आपण जगातली कोणतीही विचारसरणी आणली तरी जोपर्यंत आपण भ्रष्टाचारा लिप्त आहोत तोपर्यंत कोणत्याही विचारसरणीने आपला विकास होणार नाही. अशा प्रकारच्या चिंतनातून एकच निष्कर्ष निघत आहे की परिश्रम, पारदर्शकता आणि जनतेचा सहभाग या गोष्टी जोपर्यंत आपण अनुसरत नाही तोपर्यंत आपला विकास होणार नाही.

महाराष्ट्र विधीमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात काल झालेल्या एका परिसंवादामध्ये जलतज्ञ राजेंद्रसिंह राणा यांनी नेमकी हीच गोष्ट राज्यातल्या जनप्रतिनिधींच्या लक्षात आणून दिली. आपल्या देशातल्या सगळ्या यंत्रणांमध्ये भ्रष्टाचार एवढा बोकाळला आहे की त्या यंत्रणांसाठी सरकारने दिलेला पैसा आणि निधी भ्रष्टाचारातच जिरून जातो. योग्य त्या कामासाठी खर्च होतच नाही. नेते, अभियंते आणि कंत्राटदार यांच्या युतीने या देशाला एवढे लुटलेले आहे की स्वातंत्र्य मिळून साठ वर्षे झाली तरी अजून देशातले ८० टक्के लोक दारिद्रय रेषेखालचे जीवन जगत आहेत. राजेंद्रसिंह यांच्या उपस्थितीत झालेल्या पाण्याच्या व्यवस्थापनाबाबतच्या या त्यांनी नेमक्या याच गोष्टीवर बोट ठेवले. पाण्याच्या बाबतीत नेहमीच छोटे प्रकल्प ङ्गायद्याचे की मोठे धरण ङ्गायद्याचे असा वाद घातला जातो. पण छोट्या आणि मोठ्या धरणातला भेद ङ्गार सूक्ष्म आहे, मोठ्या धरणांपेक्षा छोटे प्रकल्प काही प्रमाणात ङ्गायदेशीर आहेत परंतु सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे प्रामाणिकपणाची. तुम्ही कोणत्या प्रकारचा प्रकल्प उभा करता यापेक्षा तो किती प्रामाणिकपणे उभा करता याला महत्त्व आहे. ही गोष्ट राजेंद्रसिंह यांनी आपल्या भाषणात अधोरेखित केली तेव्हा उपस्थित सर्व आमदारांनी आणि मंत्र्यांनीसुध्दा टाळ्यांचा कडकडाट केला. टाळ्या वाजवणार्‍यांमध्ये पाण्याऐवजी पैसे जिरवणारे मंत्रीसुध्दा होते.

राजेंद्रसिंह प्रगतीच्या आड येणार्‍या दोषांवर नेमके बोट ठेवून केवळ थांबले नाहीत तर त्यांनी उपायसुध्दा सांगितला. अशा प्रकारचे जलसंधारणाचे प्रयोग लहान प्रमाणावर आणि जनतेच्या सहभागातून पूर्णत्वास नेले पाहिजेत असे त्यांनी प्रतिपादन केले. राजेंद्रसिंहांचे हे उद्गार हे केवळ परोपदेशे पांडित्य नाही त्यांनी राजस्थानमध्ये सरकारचा एकही पैसा न घेता केवळ जनतेच्या सहभागातून सगळ्या जगाला आचंबित करणारी जलक्रांती घडविलेली आहे. जनतेच्या सहभागाचा अभूतपूर्व प्रयोग पूर्णत्वास नेऊन ते बोलत आहेत. त्यामुळे त्यांच्या बोलण्याला आणि प्रतिपादनाला आचरणाचा आधार आहे आणि ते म्हणाले त्याप्रमाणे महाराष्ट्रात त्याची गरज आहे. कारण महाराष्ट्राची दोन वैशिष्ट्ये आता समोर आली आहेत. महाराष्ट्रात छोटे मोठे मिळून १२०० धरणे आणि बंधारे आहेत आणि तरीही महाराष्ट्र हे दुष्काळाला सर्वाधिक वेळा तोंड देणारे राज्य आहे. दुसरी गोष्ट म्हणजे महाराष्ट्रात गेल्या काही वर्षात पाटबंधार्‍यावर ७० हजार कोटी रुपये खर्च झाले आहेत आणि त्यातून अगदी नगण्य एवढी जमीन पाण्याखाली आलेली आहे.

धुळे जिल्ह्याच्या शिरपूर तालुक्यात आ. अमरीश पटेल आणि जलतज्ञ सुरेश खानापूरकर यांनी राबविलेल्या शिरपूर बंधार्‍यांमध्ये दुष्काळाशी सामना करण्याची ताकद आहे हे लक्षात येताच मुख्यमंत्र्यांनी या प्रकारात लक्ष घातले आणि त्यात रस घेऊन या बंधार्‍यांच्या माध्यमातून महाराष्ट्राचा दुष्काळ कायमचा हटवण्यासाठी कंबर कसली आणि त्यांनी गावागावातल्या नाल्यावर सिमेंट बंधारे बांधण्याच्या कामाला गती दिली. मोठ्या धरणांचा आग्रह धरण्यापेक्षा अशा छोट्या प्रकल्पांवर लक्ष दिले तर छोट्या धरणातून मोठे काम होऊ शकते हे त्यांना प्रकर्षाने जाणवले. खरे म्हणजे शिरपूरमध्ये उभारण्यात आलेल्या बंधार्‍यात तसे नाविन्य नव्हते. पूर्वी शासनाच्या नाला रुंदीकरण आणि सिमेंट बंधार्‍यांच्या योजनेतून शिरपूर बंधार्‍याशी साधर्म्य असलेले बंधारे बांधले गेलेही होते. त्या दोन्हीमध्ये तपशीलात थोडासा ङ्गरक आहे एवढेच. मात्र त्या जुन्या योजनेतल्या सिमेंट बंधार्‍यांचा म्हणावा तसा उपयोग झाला नाही. तसे तर शिरपूर तालुक्यातसुध्दा अशा पध्दतीचे सिमेंट बंधारे झालेही होते आणि खानापूरकर यांनी शिरपूरच्या पध्दतीने या बंधार्‍यांची दुरूस्ती करून घेतली. तेव्हा मात्र ते उपयोगी ठरले. कारण खानापूरकरांनी ही दुरूस्ती जनतेच्या सहभागातून केलेली आहे.

शिरपूर तालुक्यातलेच नव्हे तर इतरत्र बांधलेलेही जुने निरुपयोगी ठरलेले बंधारे जनतेला अंधारात ठेवून भ्रष्टाचारातून केलेले होते. राजेंद्रसिंह यांनी नेमक्या याच गोष्टीवर बोट ठेवले आहे. भ्रष्टाचार निर्मूलन हा तर त्यांच्या प्रतिपादनाचा केंद्रबिंदू होताच पण त्यांनी जनतेलाही बरेच काही सांगितलेले आहेे. लोकांचा सध्या असा एक भ्रम झालेला आहे की जे काही करायचे ते सरकारने करावे. लोक स्वतः पुढाकार घेऊन काहीच करत नाहीत. आपली प्रगती न होण्याचे हे कारण आहे. गेल्या वर्षीच्या दुष्काळात बर्‍याच लोकांना ही गोष्ट जाणवलीही आहे आणि त्यांनी श्रमदानातून अनेक ठिकाणी पाझर तलाव खोदले आहेत, जुन्या तलावातला गाळ काढला आहे. अशा लोकांच्या सहभागातून तयार झालेल्या तलावांमध्ये यावर्षी भरपूर पाणी साठलेले आहे. सरकारची वाट पहात थांबलो असतो तर एवढे पाणी साठायला २५ वर्षे लागली असती. हे आता लोकच बोलून दाखवत आहेत.

Leave a Comment