अफगाण महिलेला मॅगॅसेसे पुरस्कार

काबूल – आशिया खंडात समाजाच्या उन्नयनासाठी विविध क्षेत्रात वैशिष्ट्यपूर्ण कामगिरी करणार्‍या नेत्यांना, कार्यकर्त्यांना आणि सनदी अधिकार्‍यांना दिला जाणारा ङ्गिलिपाईन्स्चा रेमन मॅगॅसेसे पुरस्कार यावर्षी अफगाणिस्तानातील महिलांसाठी काम करणार्‍या हबीबा सराबी यांना जाहीर झाला आहे. हबीबा सराबी यांनी अफगाणिस्तानातील महिलांच्या शिक्षणासाठी आणि नागरी हक्कांसाठी मोठा संघर्ष केलेला आहे. त्याशिवाय त्या देशात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या उभारणीतही त्यांचे मोठे योगदान आहे.

अफगाणिस्तानच्या बामियान प्रांतात प्रचंड दारिद्य्र आणि सामाजिक विषमतेच्या वातावरणात हबीबा सराबी यांनी आपले कार्य केलेले आहे. त्यांच्याशिवाय या वर्षी तीन व्यक्ती आणि दोन संस्थांना मॅगॅसेसे पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यामध्ये मॅनमारचे सामाजिक कार्यकर्ते लेपई सेंग रॉ यांचा समावेश आहे. रॉ यांनी मॅनमारमधील सशस्त्र संघर्षामुळे विस्थापित झालेल्या जनसमुदायाच्या पुनर्वसनासाठी मोठे काम केलेले आहे.

फिलिपाईन्स्मधील अर्नेस्ट्रो डोमिनिगो हेही या पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत. त्यांनी आपल्या देशामध्ये नवजात शिशूंच्या लसीकरणासाठी मोठे सामाजिक चळवळ उभी केलेली आहे. हा पुरस्कार ज्यांच्या नावे दिला जातो ते रेमन मॅगॅसेसे हे फिलिपाईन्स्चे माजी राष्ट्राध्यक्ष होते.