नितीशकुमार यांना घरचा आहेर

पाटणा – जनता दल (यू) या पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस चंद्रराज सिंघवी यांनी बिहारचे मुख्य मंत्री नितीशकुमार यांच्या मनमानीला कंटाळून पक्षाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या राजीनाम्याने नितीशकुमार यांच्या स्थानाला मोठाच धक्का बसला असल्याचे मानले जात आहे. विशेष म्हणजे बिहारच्या भारतीय जनता पार्टीत फूट पडून काही नेते जनता दलात येतील, असा दावा नितीशकुमार करत होते. पण उलट त्यांच्याच पक्षातून लोक बाहेर जात आहेत.

नितीशकुमार यांनी आपली सेक्युलर प्रतिमा उजागर व्हावी यासाठी नरेंद्र मोदी यांना सातत्याने विरोध करायला सुरुवात केली आहे. २०१० सालपासून ते सातत्याने मोदींच्या विरोधात निवेदने काढत आहेत आणि जमेल तिथे त्यांना विरोध करत आहेत. त्यांचा हा कडवा विरोध चंद्रराज सिंघवी यांना मंजूर नाही.

म्हणूनच सिंघवी यांनी आपला राजीनामा देताना पक्षाचे अध्यक्ष शरद यादव यांच्याकडे एक पत्रही पाठवून दिले आहे. एखाद्या नेत्याचा विरोध करायचा झाला तरी त्याला सुद्धा एक मर्यादा असते. नितीशकुमार ही मर्यादा ओलांडत आहेत, असे सिंघवी यांनी या पत्रात म्हटले आहे.

दरम्यान, बिहारमध्ये झालेल्या मध्यान्ह भोजनाच्या विषबाधेच्या संबंधातही पक्षात ङ्गूट पडली आहे. ही विषबाधा म्हणजे विरोधी पक्षांचा कट असल्याचे नितीशकुमार यांनी म्हटले होते. पण पक्षाचे अध्यक्ष शरद यादव यांनी आपल्याला ते मान्य नसल्याचे म्हटले आहे. हा प्रकार कशाने घडला याबाबत चौकशी केल्याशिवाय काहीही बोलणे चूक आहे, असे म्हणून शरद यादव यांनी नितीशकुमार यांना फटकारले आहे.

Leave a Comment