आयसोन धूमकेतू मधून कार्बन डाय ऑकसाईडचे उत्सर्जन

कॅलिफोर्निया दि.२५ – नासाच्या स्प्लिटझर स्पेस दुर्बीणीतून जॉन हॉपकीन विद्यापीठातील खगोल शास्त्रज्ञांनी आयसोन धूमकेतूच्या अप्रतिम प्रतिमा टिपण्यात यश मिळविले आहे. जून १३ रोजी इन्फ्रारेड कॅमेर्‍यातून घेतलेल्या या प्रतिमांमधून या धुमकेतूकडून सतत कार्बन डाय ऑकसाईड वायू व धुळीचे उर्त्सजन केले जात असल्याचे स्पष्टपणे टिपले गेले आहे.

धूमकेतूच्या अन्य निरीक्षणात त्याची शेपटी १,८६,४०० मैल म्हणजे ३ लाख किलोमीटरची असल्याचे दिसले आहे. या धूमकेतूकडून दररोज २.२ दशलक्ष पौंड कार्बन डाय ऑकसाईड सदृश वायू बाहेर पडत आहे तर १२० दशलक्ष पौंड वजनाची धूळही बाहेर फेकली जात आहे. प्रमुख निरीक्षक कॅरे लिसे यांनी दिलेल्या माहितीनुसार ही निरीक्षणे अगदी युनिक आहे. यातून जमा होणारा डेटा सौरमंडळ कधी व कसे निर्माण झाले यावर प्रकाश पाडण्यास उपयुक्त ठरणार आहे.

संशेाधक लिसे यांच्या म्हणण्याप्रमाणे या धूमकेतूचा व्यास ३ मैलांपेक्षा कमी आहे म्हणजे तो छोट्या पर्वताएवढा आहे. त्याचे वजन सात बिलियन ते सात ट्रिलियन पौंडादरम्यान असावे असा अंदाज असून अन्य धूमकेतूंप्रमाणेच हाही बर्फ, धूळ व गोठलेल्या र्गसपासून बनला आहे. त्याचे आयुष्य साधारण साडेचार अब्ज वर्षे इतके असावे असाही अंदाज दिला गेला आहे.

रशियन संशोधकांनी २१ सप्टेंबरला शोधलेला हा महाकाय धूमकेतू येत्या आक्टोबर नोव्हेंबर मध्ये पृथ्वीवरून नयनमनोहर दर्शन देणार आहे.