मुंबई दि.२४ – भारतात सोने आयातीवर खर्च होणारे परकीय चलन वाचावे आणि चालू आर्थिक खात्यातील तूट कमी करावी यासाठी सरकार आणि रिझर्व्ह बँकेने सोने आयातीवर निर्बंध जारी केल्यापासून सोने तस्करीला पुन्हा सोन्याचे दिवस दिसू लागले असल्याचे सांगितले जात आहे. विशेष म्हणजे थेट भारतात सोने तस्करी होत नसली तरी शेजारील नेपाळ आणि बांग्लादेशात मोठ्या प्रमाणावर चीन व सिगापूर येथून सोने येत असून ते भारतात पाठविण्यासाठीच येत असल्याचे दिसून आले आहे. या दोन्ही देशात सोन्याची स्थानिक मागणी नगण्य म्हणावी इतकीच असल्याने येथे अवैध मार्गाने सोने येण्याचे कारण नाही. मात्र गेल्या कांही महिन्यांत या दोन्ही देशात कस्टम अधिकार्यांनी मोठ्या प्रमाणावर तस्करीच्या मार्गाने आलेले सोने जप्त केले आहे.
गेल्या वर्षात भारतात किमान १०२ टन सोने अवैध मार्गाने आले आहे. हे प्रमाण एकूण आयातीच्या १० टक्के इतके आहे. यंदाच्या वर्षात अवैध मार्गाने किमान १४० टन सोने भारतात येईल असा अंदाज वर्ल्ड गोल्ड कौन्सिलकडून वर्तविला गेला आहे. रिझर्व्ह बँकेने घातलेल्या सोने आयातीवरील निर्बंधांमुळे देशात मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी होत आहे व यामुळेच स्मगलिंग तेजीत असल्याचे जाणकारांचे मत आहे.
नेपाळमधील गोल्ड सिल्व्हर असोसिएशनने सरकारकडे सोने लिमिट वाढवून ती सध्याच्या दररोज १५ किलोऐवजी ३० किलो करावी अशी मागणी केली आहे. गेल्या कांही दिवसांत नेपाळमध्ये चीनमधून अवैध मार्गाने मोठ्या प्रमाणावर सोने येत असल्याचे सांगितले जात आहे. मात्र हे सारे सोने भारतासाठीच असल्याचे असोएशनचे सचिव सुमंत मान यांचे म्हणणे आहे.
बांगला देशातही आर्मस पोलिस बटालियनने विमानतळावर सिंगापूर येथून आणण्यात आलेले ४०० ग्रॅम सोने जप्त केले असून त्याची किमत ७० लाख टका (बांगला रूपया) इतकी आहे. जुलैतही विमानाच्या टॉयलेटमधून आणण्यात आलेले २५ किलो सोनेही कस्टम विभागाने जप्त केले आहे तर गेल्याच आठवड्यात नपाळी पोलिसांनीही चीनमधून आलेली ३५ किलो वजनाची सोन्याची बिस्कीटे जप्त केली आहेत.