मोदींना अमेरिकेचा व्हिसा : खासदारांचा विरोध

नवी दिल्ली – सध्या अमेरिकेच्या दौर्‍यावर असलेले भाजपाचे अध्यक्ष राजनाथसिंह यांनी अमेरिकेने नरेंद्र मोदी यांना व्हिसा द्यावा, असा प्रयत्न सुरू केला आहे. परंतु त्यांच्या या प्रयत्नाला छेद देण्यासाठी भारतातल्या ६२ खासदारांनी अध्यक्ष बराक ओबामा यांंना पत्रे लिहिली आहेत. या खासदारांमध्ये केवळ कॉंग्रेसचेच खासदार आहेत असे नव्हे तर १२ विविध राजकीय पक्षांचे खासदार आहेत. प्रत्यक्षात खासदारांचे हे पत्र २०१२ सालच्या डिसेंबरमध्ये पाठवलेले आहे. मात्र आता राजनाथसिंह यांच्या प्रयत्नांच्या पार्श्‍वभूमीवर या खासदारांनी एक पत्र पाठवून ओबामा यांना त्या जुन्या पत्राची आठवण दिली आहे.

६५ खासदारांनी या निवेदनावर स्वाक्षर्‍या केल्या असल्याचे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात असे ६५ खासदार समोरच येत नाहीत. काही खासदारांनी त्या पत्रावर आपली सही नव्हती असे आता स्पष्ट केले आहे तर काही खासदारांनी पत्राचा हेतू न सांगता त्यावर आपली स्वाक्षरी घेतली अशी तक्रार केली आहे. त्यामुळे मोदींना अमेरिकेचा व्हिसा देऊ नये या मागणीवर नेमके किती खासदार ठाम आहेत याचा उलगडा होत नाही.

मध्य प्रदेशातून राज्यसभेवर निवडून गेलेले अपक्ष खासदार महंमद अबीब यांनी या संबंधात पुढाकार घेतला आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते सिताराम येच्युरी आणि एम.पी. अच्युतन् यांचाही स्वाक्षरी करणार्‍यांत समावेश आहे. आता असे पत्र पाठविण्यासोबतच यातले काही खासदार अमेरिकेच्या अध्यक्षांच्या कार्यालयातील अधिकार्‍यांंशी चर्चाही करत आहेत.