महाराष्ट्रातली धरणे तुडुंब

मुंबई – महाराष्ट्रातील उस्मानाबाद, सोलापूर, अहमदनगर, बीड आणि औरंगाबाद अशा काही जिल्ह्यांचा अपवाद सोडला तर सर्वत्र संततधार पाऊस सुरू असून राज्यातली बहुतेक धरणे आणि जलाशये भरलेली आहेत. काही धरणे ८० टक्क्यांपर्यंत भरली आहेत, काहींनी ९० टक्क्यांची पातळी गाठली आहे. पश्‍चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे उजनी धरण अजून उणे पातळीत आहे, तर मराठवाड्यातील जायकवाडी धरणात अद्याप म्हणावा तसा भरणा झालेला नाही.

हे अपवाद वगळता राज्यातील बहुतेक धरणे तुडुंब भरली असून त्यातून नदीत पाणी सोडण्यास प्रारंभ झाला आहे. सातारा जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे कोयना धरणात ८२ टक्के पाणी भरले आहे. अजून पावसाळ्याचे दोन महिने बाकी असतानाच हे धरण भरल्यामुळे त्याचे सहा दरवाजे उघडून पाणी नदीत सोडले जात आहे. कोल्हापूरच्या राधानगरी धरणाचेही चार दरवाजे उघडण्यात आले आहेत. महाबळेश्‍वर, पाचगणी, कराड, सातारा आणि वाई परिसरात प्रचंड पर्जन्यवृष्टी होत आहे.

विदर्भातील चंद्रपूर आणि गडचिरोली या दोन जिल्ह्यातील जलाशये तुडुंब भरली असून त्यांचेही पाणी नद्यांत सोडले जात आहे आणि नदीकाठी पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. नदीकाठच्या गावातील लोकांना सावधानतेचा इशारा देण्यात आलेला आहे.

Leave a Comment