व्हिसाचे एवढे कौतुक कशाला?

अमेरिकेने नरेंद्र मोदी यांना व्हिसा द्यावा अशी भाजपा नेत्याची धडपड चालली आहे आणि तो देऊ नये यासाठी भारतातले ६५ खासदार जीव तोडून प्रयत्न करत आहेत. या दोन्ही बाजूंनी विचार केला तर एक गोष्ट लक्षात येते की व्हिसा देण्यातून आणि न देण्यातून अमेरिका काय सूचित करू इच्छित आहे. हे आपल्या लक्षात आलेले नाही. नरेंद्र मोदी हे मानवाधिकाराचे मारेकरी आहेत म्हणून अमेरिकेने त्यांना व्हिसा नाकारला आहे. खरे म्हणजे मोदी असो की ओसामा बिन लादेन असो त्यांना मानवाधिकाराचे मारेकरी म्हणण्याचा अमेरिकेला काय अधिकार आहे? मानवाधिकाराच्या बाबतीत अमेरिकेचे रेकॉर्ड कसे आहे? अमेरिकेने गेल्या १०० वर्षात आपल्या स्वार्थासाठी मानवाधिकाराचा भंग कितीवेळा केला आहे याची यादी केली तर अमेरिका हा जगातला सर्वाता मोठा दहशतवादी देश आहे हे सिध्द होऊ शकेल. तेव्हा नरेंद्र मोदी हे मानवाधिकाराचे वैरी आहेत की रक्षक आहेत यासाठी आपल्याला अमेरिकेच्या प्रमाणपत्राची गरजच भासता कामा नये. मात्र आपण तसे समजून अमेरिकेचा मोठेपणा विनाकारण वाढवत आहोत आणि आपल्या देशातले एक भांडण अमेरिकेत जाऊन करत आहोत.

त्या मोदी विरोधी ६५ खासदारांनासुध्दा देश म्हणजे काय नीट कळलेले नाही. त्यांना भारताच्या सार्वभौमत्वाची कदर नाही. आपल्या देशातला एक मुख्यमंत्री जातीय दंगली घडवतो याचे गार्‍हाणे या खासदारांना अमेरिकेत जाऊन गाण्याची काय गरज आहे? यातून आपणच अमेरिकेचे महत्त्व वाढवत आहोत आणि आपल्या घरातले एक भांडण विनाकारण जगाच्या वेशीवर नेत आहोत हे त्यांना कळत नाही. अमेरिकेने जो नियम नरेंद्र मोदींना लावला आहे तसा तो आजपर्यंत कोणाकोणाला लावला आहे याचा जर हिशोब केला तर असे लक्षात येईल की आपापल्या देशामध्ये मानवाधिकाराची पायमल्ली करणार्‍या अनेक देशातल्या राज्यकर्त्यांना अमेरिकेने पायघड्या अंथरलेल्या आहेत. तोंडाने मानवाधिकाराची भाषा बोलायची आणि प्रत्यक्षात आपल्या आर्थिक स्वार्थासाठी अनेक देशामध्ये मानवाधिकार पायदळी तुडवायचे असे ढोंगी वर्तन करणार्‍या अमेरिकेला आपण का महत्त्व देत आहोत हे भाजपाच्या लोकांनाही कळेना आणि त्यांच्या विरोधकांना तर मुळीच कळेना. आपल्याला स्वाभीमान म्हणून काही गोष्ट आहे की नाही. असाच प्रश्‍न पडतो. याबाबतीत क्युबाचे उदाहरण घेण्यासारखे आहे.

जगामध्ये शीतयुध्द सुरू असण्याच्या काळात अमेरिकेच्या अगदी जवळ असलेल्या अतीशय छोट्या क्युबाने कधीही अमेरिकेचे मांडलीकत्व मान्य केले नाही. या देशाचे नेते फिडेल कॅस्ट्रो हे कम्युनिष्ट होते. त्यांनी अमेरिकेच्या डोळ्याला डोळा भिडवण्याचीच भूमिका कायम ठेवली. विचार केला तर अमेरिका क्युबाची सहज गळचेपी करू शकला असता आणि हा देश अमेरिकेशी लगत असल्यामुळे अमेरिकेला ते सहज शक्य होते. एवढेच नव्हे तर फिडेल कॅस्ट्रोने अमेरिकेचे वर्चस्व मान्य केले असते तर इराण, इराक, पश्‍चिम आशिया आणि उत्तर आफ्रिकेतल्या अनेक मुस्लीम देशातल्या राष्ट्र प्रमुखांप्रमाणे फिडेल कॅस्ट्रोसुध्दा वैभवशाली जीवन जगू शकला असता. परंतु तो स्वाभीमानी होता. त्यांनी शेवटपर्यंत अमेरिकेला जुमानले नाही. जेमतेम सव्वा कोटी लोकसंख्येचा देश एवढा स्वाभीमान दाखवू शकतो तर भारतासारखा सव्वाशे कोटीचा देश असा स्वाभीमान का दाखवू शकत नाही असा प्रश्‍न मनाला अस्वस्थ करून जातो. २०१२ च्या डिसेंबरमध्ये भारतातल्या ६५ मोदी विरोधी खासदारांनी अमेरिकेच्या अध्यक्षांना निवेदन पाठवून मोदींना व्हिसा देऊ नये असे आवाहन केले होते. राजनाथसिंह यांच्या प्रयत्नांच्या पार्श्‍वभूमीवर या खासदारांनी पुन्हा एकदा आपल्या जुन्या पत्राची ओबामा यांना आठवण करून दिली आहेे आणि कोणत्याही परिस्थितीत मोदींना अमेरिकेत प्रवेश करू देऊ नये असे फेर आवाहन केले आहे.

या निवेदनावर ६५ खासदारांच्या सह्या असल्याचे सांगितले जात आहे. गेल्या दोन दिवसांत पत्रकारांनी या संबंधात काही शोध घेतला असता या निवेदनावर ६५ खासदारांच्या सह्याच नाहीत असे लक्षात आले आहे. सह्याजीराव म्हणून ज्यांची नावे प्रसिध्द झाली होती त्यातल्या कित्येकांनी आपण सही केली नसल्याचा खुलासा केला आहे. पूर्वी या संबंधात माकपाचे खासदार सीताराम येचुरी यांचे नाव घेतले जात होते. मात्र येचुरी यांनीही आपण सही केली नसल्याचा खुलासा केला आहे. मोदी हे भारतीय आहेत त्यांचा आणि आमचा विचार सारखा नाही ही गोष्ट खरी परंतु ते भारतीय आहेत आणि त्यांना दुसर्‍या एखाद्या देशाने व्हिसा द्यावा की नाही यात मला काही रस नाही. अमेरिकेचा जितका संबंध येईल तिथंपर्यत तरी आमच्या देशातल्या या भांडणात अमेरिकेचा हस्तक्षेप मी खपवून घेणार नाही. असे येचुरी यांनी म्हटले आहे. आपण अमेरिकेला एवढी किंमत का देतो, त्यांनी मोदींना व्हिसा दिला काय की न दिला काय त्याने काय फरक पडतो, तेव्हा आपण त्यावर एवढी चर्चा का करावी असे येचुरी यांचे मत आहे आणि कोणाही देशभक्ताला ते पटण्यासारखे आहे. उलट मोदींनीसुध्दा आम्ही अमेरिकेच्या व्हिसाला किंमतच देत नाही, आम्ही या व्हिसावर थुंकतो असे म्हणून स्वाभीमान दाखवायला हवा आहे.

Leave a Comment