पेट्रोल पंपांवर मिळणार ५ किलोचे गॅस सिलिंडर

नवी दिल्ली दि.२४ – देशाच्या कांही ठराविक शहरांतून येत्या पंधरा दिवसांत म्हणजे ऑगस्टपासून ५ किलोचे स्वयंपाकासाठीच्या गॅसचे सिलिंडर ग्राहकांना मिळू शकणार आहेत. सिलिंडर विक्रीत होत असलेला काळा बाजार रोखण्यासाठी पट्रोलियम मंत्रालयाने ही उपाययोजना केली असून तेल कंपन्यांना असे छोटे सिलिंडर विकण्याची परवानगी देण्यात आली आहे असे समजते.

सध्या प्रायोगिक तत्त्वावर हा उपक्रम सुरू करण्यात येत असून त्यात दिल्ली, मुंबई, चेन्नई, हैद्राबाद, बंगलोर, कोलकाता या शहरांत ही योजना राबविली जाणार आहे. सर्व तेल कंपन्यांच्या पेट्रोल पंपांवर त्यांची विक्री कोको आऊटलेटमधून केली जाणार आहे. दिल्लीत सबसिडाईज्ड सिलिडरसाठी ४०० रूपये तर सबसिडी नसलेल्या सिलिडरसाठी ८३२ रूपये आकारले जात आहेत. हे छोटे सिलिडर व्यावसायिक दरानेच ग्राहकांना घ्यावे लागणार असून त्यांची किंमत ३६१ रूपये असेल असे समजते.

घराबाहेर राहणारे विद्यार्थी आणि ज्यांना मोठ्या सिलिंडरची गरज नाही असे ग्राहक यांच्यासाठी ही योजना फायद्याची ठरणार असल्याचेही सांगितले जात आहे.

Leave a Comment