नवजात युवराजाचे प्रजेला दर्शन

लंडन दि.२४ – प्रिन्स विल्यम्म आणि राजकुमारी केट यांच्या पोटी जन्मास आलेल्या ब्रिटन राजघराण्यातील नवजात युवराजाने आज जगाला पहिले दर्शन दिले. सेंट मेरी रूग्णालयातून केटला डिस्चार्ज देण्यात आल्यानंतर विल्यम्स व राजपुत्रासोबत ती रूग्णालयाबाहेर आली तेव्हा युवराज दिसावा म्हणून लंडनमधील नागरिकांनी तसेच प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी प्रचंड गर्दी केली होती. युवराज दिसताच गर्दीने एकच जल्लोष केला. शुभ्र ब्लँकेटमध्ये गुंडाळलेल्या युवराजाने त्याची दखल घेऊन आपला चिमुकला हात क्षणभरच बाहेर काढला असे समजते.

जमलेल्या नागरिकांच्या हार्दिक शुभेच्छांचा स्वीकार करताना प्रिन्स विल्यम्सने बाळाचे नांव अजून ठरविले नसल्याचे सांगत तो अगदी केटसारखा दिसतोय असेही सांगितले. आम्हीही आमच्या बाळाला आत्ताच व्यवस्थितपणे पाहतो आहोत असे सांगून तो म्हणाला की तुम्ही बाळ पाहण्यासाठी दीर्घ काळ प्रतीक्षा केली आहे याची आम्हाला जाणीव आहे.

राजकुमारी केट हिने मात्र बाळाचा जन्म हा अतिशय इमोशनल क्षण होता असे सांगितले. दवाखान्यातच आजोबा प्रिन्स चार्लस यांनीही रूग्णालयातील लिडो विगला भेट देऊन नातवाचे तोंड पाहिले. याच विंगमध्ये चार्लस यांची दोन्ही मुले विल्यम्स आणि हेन्री यांचे जन्म झाले आहेत. केटच्या आईवडिलांनीही रूग्णालयातच प्रथम नातवाचे तोंड पाहिले.

दरम्यान बाळाचे नाव काय असेल यावरून ब्रिटनमध्ये प्रचंड प्रमाणावर बेटींग सुरू झाले असून सट्टेबाजांनी जॉर्ज या नावाला प्राधान्य दिले आहे. जॉर्ज साठी दोनास १, जेम्ससाठी ४ -१, अलेक्झांडर साठी ८-१, लुईस साठी ११-१ तर हेन्री या नावासाठी १२-१ असा दर निघाला असल्याचेही समजते.

Leave a Comment