अॅम्बॅसिडर नव्या स्वरूपात सादर होणार

नवी दिल्ली दि.२४- हिंदुस्थान मोटर्सच्या अॅबँसिडरला बीबीसी टॉप गियरने गेल्या आठवड्यात ‘ बेस्ट टॅक्सी इन द वर्ल्ड‘  या सन्मानाने गौरविल्यानंतर कंपनीने आपली ही गाडी नव्या आधुनिक स्वरूपात पुन्हा ग्राहकांसाठी पेश करण्याचा निर्णय घेतला आहे. या वर्षअखेर नवीन स्वरूपातील अॅम्बॅसिडर ग्राहकांच्या सेवेत रूजू होणार असल्याचे समजते.

जगभरातील नामवंत कार उत्पादक कंपन्या त्यांच्या नित्यनवीन आधुनिक कार बाजारात आणत आहेत. त्या गर्दीत अॅम्बॅसिडर गाडी झाकोळून गेली होती. राजकारणी आणि टॅक्सीचालक तेही छोट्या शहरातले या गाडीचा वापर प्रामुख्याने करत होते. मात्र या गाडीची गुणवत्ता लक्षात घेऊन कंपनीने नव्या स्वरूपात ही गाडी पुन्हा बाजारात आणण्याचे ठरविले आहे. जुन्याच प्लॅटफॉर्मचा वापर त्यासाठी करण्यात येणार असला तरी अनेक नवीन फिचर्स आणि मॉडर्न लुक खास तरूण आणि आधुनिक जनरेशनसाठी गाडीला दिला जाणार आहे असे कंपनीचे प्रमुख उत्तम बोस यांनी सांगितले.

बोस म्हणाले की नव्या मॉडेलमध्ये गाडीच्या डिकीची जागा कमी केली जात आहे. कमी किमतीत अनेक नवीन फिचर्स यात ग्राहकांना दिली जाणार आहेत. ग्राहकांना त्यांच्या पैशांचा पूर्ण मोबदला मिळेल याची काळजी घेतली जात आहे. कंपनीचे जुने वर्कहाऊस नायजेरियात हलविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. बोस म्हणाले की बांग्ला देशाकडून कंपनीला मिळालेल्या ऑर्डरमुळे आमचा उत्साह वाढला आहे.