बेतुल- गेल्या काही दिवसांपासून सर्वत्र विषबाधेचे प्रकार होत आहेत. त्यामुळे आता विद़यार्थीदेखील जागरूक झाले आहेत. या सर्व विषबाधांच्या प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर मध्य प्रदेशातील अशीच एक मोठी घटना विद्यार्थ्यांच्या अतिदक्षतेमुळे टळली आहे. यामुळे कित्येक विदयार्थ्याचे प्राण वाचले आहेत. जेवणात विष मिसळण्याचा प्रयत्न करणारा आरोपी भजन सिंह फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.
मध्य प्रदेशातील आदिवासी विद्यार्थ्यांसाठी असलेल्या पळसपाणी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या सावधगिरीमुळे मोठा अनर्थ टळला. या गावातील भजनसिंह मार्सकोळे नावाच्या पंचायत सदस्याने या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी ज्या खोलीत अन्न शिजवले जाते त्या खोलीत जाऊन धान्य शिजवण्यासाठी उकळत ठेवलेल्या पाण्यात काहीतरी मिसळले. या वसतिगृहाच्या सुरक्षारक्षकाशी झालेल्या वादानंतर सूड उगवण्यासाठी त्याने कोणत्या तरी प्रकारचा विषारी पदार्थ पाण्यात मिसळला होता. मात्र, त्या पदार्थामुळे स्वयंपाकघरात पसरलेल्या उग्र वासामुळे तिथे असलेले तीन विद्यार्थी व एका आचा-याने ही बाब वसतिगृहाच्या अधीक्षकांच्या कानावर घातली.
हा गंभीर प्रकार लक्षात येताच ताबडतोब ते पाणी व खोलीत असलेली सर्व अन्नसामग्री फेकून देण्यात आली. त्यातील नमुने पोलिसांनी जमा केले असून ते परीक्षणासाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. सरमेश कासडेकर, सागर साळवे व राजा अशी या तीन विद्यार्थ्यांची नावे आहेत. त्यांच्या आणि त्या आचा-याच्या दक्षतेमुळे वसतिगृहातील अनेक विद्यार्थ्यांचा जीव वाचल्याची भावना वसतिगृहाचे अधीक्षक विजयकुमार साळवे यांनी व्यक्त केली आहे. जेवणात विष मिसळण्याचा प्रयत्न करणारा भजन सिंह फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.