दिव्या दत्तालाही पडली ‘आयटम सॉँग’ची भुरळ

– अभिनेत्री दिव्या दत्ताने आजवर बॉलीवूडच्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिचा शानदार अभिनय समीक्षकांच्या नेहमीच पसंतीस उतरला आहे. सध्या सर्वत्र गर्दी खेचत असलेल्या ‘भाग मिल्खा भाग’ या चित्रपटातील दिव्याच्या भूमिकेचेही सर्वत्र कौतुक होत आहे. मात्र असे असूनही व्यावसायिक पातळीवर तिचा यशाचा आलेख कधीच फारसा वर चढला नाही. यातून बाहेर पडण्यासाठीच की काय, आता दिव्याला अल्पावधीत लोकप्रियता मिळवून देणार्‍या ‘आयटम साँग’ची भुरळ पडली आहे. व्यावसायिक यश मिळविण्यासाठी तिने आयटम नंबरमध्ये आपला जलवा दाखवून देण्याचा निर्णय घेतला आहे.

आजकाल सगळ्य़ाच नट्यांना आयटम साँग आकर्षून घेत आहे. सुरुवातीच्या त्या नावाने नाके मुरडणार्‍याही त्यावर थिरकताना दिसत आहेत. आयटम सॉँगची चलती पाहता आपल्यातील ग्लॅमर दाखवून देण्याची ही उत्तम संधी ठरू शकते, असे दिव्याला वाटत आहे. अर्थात याबाबत आत्ताच फार काही बोलण्यास ती तयार नाही. याविषयी छेडले असता तिने एवढेच सांगितले की, माझ्या कारकिर्दीत आता असे घडणार आहे, जे याआधी मी कधीच केले नव्हते. हल्ली बहुतांश चित्रपटांत आयटम साँग दिसते, पण हे आयटम सॉँग इतरांपेक्षा वेगळ्य़ा धाटणीचे असल्याने ते करण्यास मी होकार दिला आहे. त्यामध्ये प्रेक्षकांना माझे एकदम वेगळेच रूप दिसेल. बहुधा आपल्या मागच्या चित्रपटाला विशिष्ट वर्गात मिळालेले यश पाहून दिव्या आता सगळ्य़ाच प्रकारच्या प्रेक्षकांच्या नजरेत भरण्यासाठी आयटम साँगचा तडखा दाखवून देण्याची तयारी करीत आहे. त्यात ती कितपत सफल होते, ते येणारा काळच सांगेल.

Leave a Comment