तोल सांभाळावा लागेल

मुंबईतल्या युवक कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांना सदस्य नोंदणीत अडचण यायला लागली आहे. ते या निमित्ताने कोणाला भेटायला गेले तर लोक त्यांना केन्द्र सरकारातल्या भ्रष्टाचाराविषयी प्रश्‍न विचारायला लागले आहेत. सदस्य नोंदणी होईनाशी झाली. हा सारा पक्षाच्या बदनामीचा परिणाम आहे म्हणून त्यांनी भ्रष्टाचार रोखण्याच्या ऐवजी बदनामी करणारांवर हात उगारायचे ठरवले आणि मुंबईतला एक हॉटेल मालक त्यांच्या तावडीत सापडला. या हॉटेल चालकाच्या बिलावर आक्षेपार्ह मजकूर छापण्यात आलेला होता. त्यात पक्षाची बदनामी केली होती. त्याच्या निषेधार्थ या कार्यकर्त्यांनी त्याचे हॉटेल बंद पाडले. सध्या माध्यमांचा प्रसार ङ्गार प्रभावी झाला आहे आणि घडलेली घटना मुंबईत घडली आहे त्यामुळे या घटनेची माहिती काही तासांतच देशभरात जाऊन पोचली आहे. या गोष्टीचे परिणाम काय होतील याची कल्पना या कार्यकर्त्यांना नाही असे दिसते. रागाच्या भरात त्यांनी हे आततायीपणाचे कृत्य केले आहे. कालच कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी कॉंग्रेसच्या प्रवक्त्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या शिबिरात बोलताना आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना आपापसातील मतभेद कमी करण्याचा आणि बोलताना पक्षाची पंचाईत होणार नाही याची काळजी घेण्याचा आदेश दिला होता. त्यांची सूचना आपण कशी मानत नाही हे या कार्यकर्त्यांनी दाखवून दिले आणि पक्षाची पंचाईत करणारा उद्योग केला. राहुल गांधी यांनी या प्रसंगी कोणाचेही नाव घेतलेे नाही पण ते पक्षातल्या वाचाळवीरांना उद्देशून बोलले आहेत असे मानले जात आहे.

अर्थात त्यात दिग्विजयसिंग यांचा क्रमांक सर्वात वरचा आहे आणि या संतापाला काल इंडियन मुजाहेदीन या संघटनेविषयी बोललेल्या दोघा नेत्यांचा ताजा संदर्भ आहे. राहुल गांधी यांनी कितीही संताप व्यक्त केला असला तरीही अशा वाचाळवीरांना आवरणे पक्षाला अशक्य आहे हे अनेकवेळा दिसून आले आहे. पक्षाला या वाचाळांवर कारवाईच करायची असती तर दिग्विजयसिंग हे मागेच पक्षातून बडतर्ङ्ग झाले असते. कारण त्यांनी पक्षाला शोभा देणार नाही असे विधान केल्याशिवाय एक दिवसही जात नाही. या गृहस्थाला पक्षातून काढणे तर दूरच पण उलट राहुल गांधी यांनी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत आपले सल्लागार म्हणून नेमले होते. या निवडणुकीत दारुण पराभव झाल्यावर तरी त्यांची किंमत कमी व्हायला हवी पण तसे काही झालेले नाही. एकंदरीत राहुल गांधी यांना पक्षाला अडचणीत आणणार्‍यांचा राग येतो पण ते या लोकांवर कसलीही कारवाई करू शकत नाहीत. या बाबत पक्षश्रेष्ठींचीच अवस्था तोंड दाबून बुक्क्यांचा मार अशी झाली आहे.

आता मुंबईतल्या यु.कॉं.च्या कार्यकर्त्यांनी तर तोंड दाखवायला जागा ठेवलेली नाही. सरकारने एसी हॉटेलांवर जादा कर लावला. या कराला त्या हॉटेल मालकाचा विरोध होता. त्याने आपल्या बिलावर काही मजकूर छापून या कराचा निषेध केला. मंत्र्यांनी पैसे खाणे ही पक्षाची गरज आहे आणि ए.सी. हॉटेलात जेवण करणे ही चैन आहे अशी ओळ या बिलावर होती. सरकारचा निषेध नोंदवायची त्याची ही रीत नवी होती. त्यामुळे ती ङ्गेसबुकवर आली आणि सर्वांना कळली. युवक कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांना ती कळली तेव्हा ते चिडले. त्यांनी या हॉटेलात जाऊन धुडगूस घातला. हॉटेल मालकाने घाबरून हॉटेलच बंद करून टाकले. या घटनेला आता राजकीय स्वरूप आले आहे कारण युवक कॉंग्रेसच्या या कृत्याची सार्वजनिक निर्भत्सना सुरू झाली आहे. काल राहुल गांधी यांनी आपल्या पक्षाच्या प्रवक्त्यांना जबाबदारीने बोलायला सांगितले होते पण त्याच्या दुसर्‍याच दिवशी महाराष्ट्रातले कॉंग्रेसचे आणि युवक कॉंग्रेसचे प्रवक्ते या प्रकाराबाबत चुकीचे तर बोललेच पण एका सुरात बोलले नाहीत. दोघेही वेगवेगळे चुकीचे बोलले. युवक कॉंग्रेसच्या स्थानिक प्रवक्त्याने म्हटले. या हॉटेल मालकाला हा कर नको असेल तर त्याने लोकशाही मार्गाने आपले म्हणणे मांडायला हवे होते. त्याने भ्रष्टाचारी मंत्र्यांचा संदर्भ देऊन पक्षाला बदनाम करण्याचे कारण काय?तो हा मार्ग अवलंबत असेल तर हे हॉटेल बंद पाडण्यात चूक काय ?

या मालकाने आपले मत व्यक्त करायला आपल्या बिलाचा वापर केला हा काय लोकशाहीत बसणारा मार्ग नाही का ? तो लोकशाहीत बसत नाही असे या युकॉँच्या नेत्यांचे म्हणणे आहे तर त्याचे हॉटेल बंद पाडणे हा कोणत्या लोकशाहीतला मार्ग आहे ? कोणताही मंत्री पैसे खातो ही पक्षाची जबाबदारी नाही तर कोणाची जबाबदारी आहे ? त्यावरून पक्षाला बदनाम करायचे नाही तर कोणाला बदनाम करायचे ? भाजपाचा मंत्री भ्रष्टाचार करताना सापडला तर कॉंग्रेसचे नेते त्या भ्रष्टाचाराला भाजपाला जबाबदार धरत नाहीत का? या कार्यकर्त्यांची खरी अडचण अशी की, ते आपल्या पक्षाची सदस्य नोंदणी करायला जातात तेव्हा लोक त्यांना भ्रष्टाचाराबद्दल विचारतात. अशा वेळी हे कार्यकर्ते पैसे खाणार्‍या मंत्र्यावर चिडत नाहीत तर पैसे खाण्याचा आरोप करणारांवर चिडतात. त्यांची ही पद्धत लोकशाहीत तर बसतच नाही पण तारतम्यातही बसत नाही. त्यांच्या अध्यक्षांनी तर वेगळेच कारण सांगितले. हे हॉटेल बेकायदा होते म्हणून ते बंद पाडले असे ते म्हणाले. तसे असेल तर युवक कॉंग्रेसचे नेते आता बेकायदा हॉटेले बंद पाडण्याची मोहीम काढणार आहेत असे समजायचे का ? तशी मोहीम काढायची झाल्यास त्यांना आपल्याच पक्षाच्या अनेक नेत्यांची हॉटेले आधी बंद पाडावी लागतील.

Leave a Comment