तारांकित हॉटेलातही डान्स बारला बंदी

मुंबई – राज्य सरकारला महाराष्ट्रात डान्स बार बंदी राबवता आली नाही. परंतु आता त्या संबंधीच्या आदेशातल्या त्रुटी दूर करून डान्स बार बंदीचा निर्णय पुन्हा राबवण्याचा सरकार विचार करत आहे. या नव्या निर्णयात सरकारला तारांकित हॉटेलातल्या नृत्यांवरही बंदी घालावी लागणार आहे आणि शासनाने तशी तयारी केली असल्याचे गृहमंत्र्यांच्या निवेदनावरून स्पष्ट झाले आहे. गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी राज्य सरकार पुन्हा एकदा दुरुस्त आदेश काढणार असल्याचे सांगितले.

राज्य सरकारचा डान्स बार बंदीचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने अवैध ठरवला आहे. ही बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर गृहमंत्र्यांनी लगेच प्रतिक्रिया व्यक्त केली नव्हती. न्यायालयाचा आदेश पाहिल्यानंतरच प्रतिक्रिया व्यक्त करू, असे ते म्हणाले होते. आता त्यांनी आदेश वाचला असून राज्य शासनाचा डान्स बार बंदीचा कायदा नेमका कोणत्या मुद्यावर रद्द झाला आहे याचा अभ्यास केला आहे.

राज्य शासनाच्या आदेशातून पक्षपात होत होता. सामान्य हॉटेलातल्या डान्स बारला बंदी घालत असतानाच तारांकित हॉटेलातले नृत्याचे कार्यक्रम या बंदीपासून मुक्त होते. शासनाचा हा पक्षपातच त्याचा आदेश रद्द होण्यास कारणीभूत ठरला. आता हाच मुद्दा पकडून तारांकित हॉटेलातल्या नृत्यांनाही बंदीत समाविष्ट करून नवा आदेश काढला तर तो अवैध ठरणार नाही हे मंत्र्यांच्या लक्षात आले आहे. नव्याने आदेश काढताना ही दक्षता घ्यावी लागेल, हे त्यांना जाणवत आहे.

अशा प्रकारची काळजी घेऊन पुन्हा डान्स बार बंदी लागू करण्यास शासन उत्सुक आहे. कारण शासनाचा आदेश सर्वोच्च न्यायालयात रद्दबातल झाल्याने शासनाची प्रतिष्ठा धुळीला मिळाली असल्याची भावना निर्माण झाली आहे. परिणामी डान्स बार बंदी हा प्रतिष्ठेचा विषय झाला असून शासन पुन्हा एकदा नवा आदेश काढण्यासाठी हट्टाला पेटले आहे.

Leave a Comment