तज्ज्ञ व्यक्ती कोणाला म्हणावे याची एक व्याख्या एका विचारवंताने केली होती. जो सत्य, अर्धसत्य, असत्य आणि सोयिस्कर सत्य यांचा योग्य मिलाप करून आपले म्हणणे लोकांच्या गळी उतरवतो आणि ते असत्य सांगताना सभ्यपणाचा आव आणतो तो खरा तज्ज्ञ होय, असे त्यांनी म्हटले होते. जागतिक कीर्तीचे भारतीय अर्थतज्ज्ञ डॉ. अमर्त्य सेन यांनी आपण या व्याख्येस पूर्णपणे पात्र आहोत हे दाखविण्याचा चंगच बांधला आहे. नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेने धास्तावलेल्या कॉंग्रेसवाल्यांचा मदतीला जाण्यासाठी अमर्त्य सेन यांनी सत्य आणि सोयिस्कर सत्य यांचा योग्य मिलाप करून मोदी हे पंतप्रधानपदास कसे अपात्र आहेत हे दाखवून देण्याचा व्यर्थ खटाटोप केला आहे. अमर्त्य सेन हे ङ्गार मोठे प्रस्थ आहे. नोबेल पुरस्कार मिळाल्यामुळे त्यांची जगात ङ्गार ख्याती झालेली आहे. त्यामुळे ते जे काही बोलतात त्याला ब्रह्मवाक्याचे स्वरूप येते. त्यांनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत नरेंद्र मोदी हे भारताचे पंतप्रधान म्हणून आपल्याला चालणार नाहीत, असे विधान केले. अमर्त्य सेन हे भारतीय नागरिक आहेत पण ते भारतात रहात नाहीत. पण नागरिक म्हणून त्यांना बोलण्याचा अधिकार आहे, पण ते जे काही बोलतील ते सत्यच असते किंवा तर्कशुद्धच असते असे मानण्याचे मात्र काही कारण नाही. परंतु ज्यांना खरोखरच नरेंद्र मोदी नको आहेत अशा लोकांना आता आपल्या म्हणण्याच्या समर्थनार्थ अमर्त्य सेन यांचे उद्धरण देण्याचा मोह झाल्याशिवाय राहणार नाही. आम्हालाच काय परंतु अमर्त्य सेन यांना सुद्धा नरेंद्र मोदी नको आहेत असे म्हणण्याची सोय या मोदीविरोधकांना झाली आहे. मोदी यांच्या बाबतीत त्यांनी जे काही म्हटले आहे त्यात काही तथ्य असते तर आम्ही सुद्धा अमर्त्य सेन यांचे म्हणणे मान्य करून मोदींच्या विरोधात उभे राहिलो असतो. पण अमर्त्य सेन यांच्यासारखा दिग्गज अर्थतज्ज्ञ सुद्धा सपशेल खोटे बोलतो हे त्यांनी त्यांच्या उद्धरणातून सिद्ध केले आहे.
अमर्त्य सेन यांचे अर्धसत्य
मोदी यांच्या आर्थिक प्रगतीचा आढावा घेताना त्यांनी जी आकडेवारी सांगितली आहे ती पाहिली म्हणजे अमर्त्य सेन यांची दया आल्याशिवाय रहात नाही. गुजरातमधील ग्रामीण भागातील जनतेचा कौटुंबिक खर्च भारतात सातव्या क्रमांकाचा होता, तो आता नवव्या क्रमांकावर गेला आहे. हा आकडा अमर्त्य सेन यांनी ङ्गार जोर देऊन सांगितला आहे. त्यांच्या या आकड्यामुळे काही गिनेचुने कॉंग्रेसजन ङ्गार तर खूष होतील, परंतु ग्रामीण गुजराती लोकांचा कौटुंबिक खर्च नवव्या क्रमांकावर आला म्हणजे नेमके काय आणि तसा तो येणे म्हणजे अर्थव्यवस्था डबघाईला आली आहे असा अर्थ होतो का? हे ज्या अर्थतज्ज्ञांना कळते ते अर्थतज्ज्ञ अमर्त्य सेन यांना चक्क ढोंगी म्हटल्या शिवाय राहणार नाहीत. कारण ग्रामीण भागातल्या जनतेचा खर्च नवव्या क्रमांकावर आला असला तरी तो कमी झालेला नाही, अन्य दोन राज्यात तो वाढला म्हणून गुजरातचा नंबर नववा झाला आहे. पण एकूण अर्थव्यवस्थेच्या कामगिरीत एवढ्या एका आकड्याला किती महत्व द्यायचे हे जाणकारांना कळत असते. अमर्त्य सेन यांना सुद्धा कळते. पण त्यांना नरेंद्र मोदींची लोकप्रियता कमी करण्यासाठी लोकांची दिशाभूल करण्याची युक्ती करावीशी वाटत आहे.
गुजरातमधल्या मुस्लीम लोकांना सुरक्षित वाटत नाही. त्यांना सुरक्षित वाटावे असे वातावरण तयार करण्यात नरेंद्र मोदी यांना यश आलेले नाही, असा अमर्त्य सेन यांचा आरोप आहे. तिथल्या मुस्लिमांच्या नावाने नरेंद्र मोदी यांना असे आरोपीच्या पिंजर्यात उभे करताना मात्र अमर्त्य सेन यांना कसलाही पुरावा द्यावासा वाटत नाही आणि एखादी आकडेवारी पेश करावी असेही वाटत नाही. नाही तरी जगातल्या सगळ्याच तज्ज्ञांची ही खासियत असते. सोयिस्कर असेल तिथे आकडेवारी ङ्गेकायची आणि नसेल तिथे संदिग्ध आरोपावर भागवून न्यायचे हा त्यांचा खाक्याच असतो. नरेंद्र मोदी यांचे आर्थिक अपयश पटवून देताना अमर्त्य सेन यांनी एक भ्रामक आणि सूक्ष्मातला सूक्ष्म का होईना पण आकडा तरी पेश केलेला आहे. मात्र त्यांच्या मते मुस्लिमांसाठी असुरक्षित झालेल्या गुजरातमधून किती मुुस्लिमांनी भयभीत होऊन स्थलांतर केले याचा एकही आकडा अमर्त्य सेन यांनी दिलेला नाही. गुजरातमध्ये मुस्लीम असुरक्षित असते आणि त्यांना तिथे राहणे अशक्य होऊन बसले असते तर या मुस्लिमांनी महाराष्ट्र, राजस्थान अशा कॉंग्रेसशासित राज्यांमध्ये स्थलांतर केले असते. पण अशा स्थलांतराचे एकही उदाहरण समोर आलेले नाही.
मोदी यांच्या गुजरातमध्ये मुस्लीम असुरक्षित तर नाहीतच पण ते भारतीय जनता पार्टीत आलेले आहेत आणि कित्येक नगरपरिषदांमध्ये तसेच महानगरपालिकांमध्ये भाजपाच्या तिकिटावर अनेक मुस्लीम निवडून आलेले आहेत. २००२ सालच्या दंगलीचे उदाहरण सारखे सारखे उगाळीत बसलेले अमर्त्य सेन यांच्यासारखे कॉंग्रेसचे चमचे २००२ ते २०१३ या काळात गुजरातेत एकही दंगल झालेली नाही याची दखलच घेत नाहीत. किंबहुना तशी दखल घेणे त्यांना सोयीचे वाटत नाही. कित्येक मुस्लीम नेत्यांनी गुजरातेत हिंदूंच्या सोबत मुस्लिमांचा सुद्धा आर्थिक विकास होत आहे असे उघडपणे मान्य केलेले आहे. पण या बातम्या अमर्त्य सेन यांना सोयीच्या वाटत नसाव्यात. २००२ च्या गुजरात दंगलीचा कोळसा उगाळणार्या आणि त्यावरून मोदींना पंतप्रधानपदास अपात्र ठरवणार्या अमर्त्य सेन यांना राजीव गांधींच्या नेतृत्वाखाली १९८४ साली इंदिरा गांधींच्या हत्येनंतर दिल्लीत झालेल्या शीखविरोधी दंगलींची तर आठवणही होत नसेल. या दंगलीबद्दल कॉंग्रेसच्या खासदारावर खटला चालवावा, असा निकाल कालच दिला गेला आहे आणि गेल्या बारा वर्षात न्यायालयाच्या कोणत्याही चौकशीमध्ये गुजरात दंगलीबद्दल मोदी यांना दोषी धरलेले नाही. अर्थात अमर्त्य सेन यांना हे पुरावे सोयिस्कर वाटत नसतील, पण ते जनतेला दिसतात.
