विजापूरजवळ जीप अपघातात १८ ठार

सोलापूर – सोलापूर ते विजापूर या मार्गावरील विजापूर जिल्ह्यातील चिक्कसिंदगी या गावाजवळ २२ जुलै रोजी दुपारी ४ वाजता झालेल्या भीषण अपघातात सांगली जिल्ह्यातील १८ भाविक ठार झाले तर चौघे जखमी झाले. या भाविकांच्या क्रूझर गाडीला खाजगी बसने धडक दिल्यामुळे हा अपघात झाला.

अपघातात मरण पावलेले भाविक सांगली जिल्ह्यातल्या जत तालुक्यातील डङ्गळापूर, कोळगाव आणि बसप्पावाडी या तीन गावचे राहणारे होते. गुरु पौर्णिमेनिमित्त गुलबर्गा जिल्ह्यातील गाणगापूर येथे खाजगी वाहनाने येऊन दर्शन घेऊन ते विजापूर मार्गे सांगलीकडे जात होते. चिक्कसिंदगीजवळ एका वळणावर त्यांना खाजगी बसने धडक दिली.

या अपघातात सापडलेल्या क्रूझर गाडीमधून २० प्रवासी प्रवास करत होते. त्यातील चौदा पुरुष, तीन महिला आणि एक सहा वर्षाचे बालक असे १८ जण प्राणास मुकले. त्यांच्या क्रूझर गाडीचा या अपघातात चक्काचूर झाला. अपघातात मरण पावलेल्यांची ओळख पटवणे अशक्य होऊन बसावे इतकी त्यांच्या मृतदेहांची अवस्था वाईट झाली होती.

Leave a Comment