बंगळूरू – चालू वर्षाच्या ऑक्टोबरमध्ये आखण्यात आलेली भारताची मंगळावरची मोहीम ही केवळ प्रतिष्ठेपायी आखलेली नसून तिच्यामागे काही नेमके संशोधन करण्याचा हेतू आहे असे इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (इस्रो) चे अध्यक्ष डॉ. के. राधाकृष्णन यांनी स्पष्ट केले आहे. इस्रोच्या या मोहिमेवर ४५० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे पण काही लोकांनी हा खर्च निरर्थक असल्याची टीका सुरू केली आहे. अशा लोकांच्या मनातल्या शंका कुशंकांचे निराकरण करण्यासाठी डॉ. राधाकृष्णन यांनी पत्रक़ार परिषद घेऊन हा खुलासा केला.
मंगळावर येत्या २० ते ३० वर्षात मानवी वस्तीही होण्याची शक्यता आहे. याचा विचार करून आपल्या अवकाश संशोधनात मंगळाला आगळे महत्त्व आहे असे राधाकृष्णन म्हणाले. आजवर मंगळावर स्वारी करण्याचा प्रयत्न अमेरिका, रशिया, यूरोप, जपान आणि चीन या पाच देशांनी केला आहे. या बाबत भारताचा सहावा क्रमांक आहे. या मोहिमेमागे भारताची तांत्रिक क्षमता तपासणे हाही हेतू आहे कारण तशी क्षमता असल्यावरच आपण मंगळाच्या कक्षेत काही निरीक्षणे अचूकपणाने नोंदवून घेणार आहोत.
मंगळावर आता मानवासारखा किंवा मानवसदृश्य प्राणी आहे का याचा शोध घेणे महत्त्वाचे आहे. तसा तो असेल तर मंगळाच्या वातावरणात मिथेन वायू असणारच. मिथेन वायू ही सजीवाच्या अस्तित्वाची खूण असते. आपला मंगळावर जाणारा उपग्रह मंगळाच्या पृष्ठभूमीवर उतरणार नाही पण तो मंगळाच्या कक्षेत ङ्गिरता ङ्गिरता तिथल्या मिथेन वायूचा अंदाज घेईल. त्यासाठी मंगळावर जाणार्या उपग्रहात मिथेनची नोंद घेणारी सेन्सर्स बसवलेले आहेत असे राधाकृष्णन यांनी सांगितले.
भारतीय उपग्रहाने मंगळाच्या काही वेगळ्या नोंदी घेतल्या तर त्याची ती माहिती इतर देशांसाठीही उपयुक्त ठरणारी असेल. नंतर या देशांना मंगळावर काही मोहिमा आखायच्या असतील तर त्यांना भारताची ही माहिती उपयोगी पडणार आहे असेही राधाकृष्णन म्हणाले.