कांदा निर्यात बंदीचा निर्णय अवघड

नवी दिल्ली दि.२३ – देशाच्या बाजारात वाढत चाललेल्या कांद्याच्या किमतींवर नियंत्रण आणण्यासाठी कांदा निर्यात बंदी करण्याचा केंद्र विचार करत असले तरी अशी बंदी घालणे सध्या अवघड असल्याचे मत जाणकार व्यक्त करत आहेत.

कांद्याचे भाव हा विषय नेहमीच संवेदनशील राहिला आहे. कांद्यांच्या किमतींवर संबंधित विभाग बारकाईने लक्ष ठेवून आहेत आणि कांद्याच्या किमती नियंत्रणात राहण्यासाठी निर्यात बंदी शिवाय अन्य कोणते पर्याय आहेत याचाही शोध घेतला जात आहे. गेले कांही आठवडे कांद्यांचे भाव वाढत चालले असून आणखी दोन ते तीन महिने तरी त्यात घट होण्याची शक्यता नाही. गत वर्षी दुष्काळामुळे कांदा उत्पादक महाराष्ट्रात पीक कमी आले आहे आणि नवीन कांदा बाजारात येण्यास अजून किमान दोन ते तीन महिन्यांचा अवधी आहे असे सांगितले जात आहे.

दिल्लीत सध्या कांद्याचे दर ३५ ते ४० रूपये किलोंवर आहेत. देशातील सर्वात मोठा ठोक कांदा बाजार समजल्या जाणार्‍या महाराष्ट्रातील लासलगांव बाजारात कांद्याचे भाव २५ रूपये किलोंवर पोहोचले आहेत. चालू वर्षाच्या सुरवातीला पहिल्या तिमाहीत ७७६.४७ कोटी रूपयांचा ५,११,६१६ टन कांदा निर्यात केला गेला आहे. मात्र आता निर्यात बंदी करण्याशिवाय दर नियंत्रणाचा दुसरा मार्ग नसल्याचेही मत व्यक्त केले जात आहे.

तज्ञांच्या मते देशाची चालू खात्यातील तूट भरून काढण्यासाठी निर्यात वाढीचे प्रयत्न केले जात असताना कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेणे सरकारला अवघड जाणार आहे. भारतातून बांग्लादेश, सिगापूर, मलोशिया येथे कांदा निर्यात होतो. यावर्षी कांदा उत्पादन दरवर्षी इतकेच होईल असा अंदाज आहे मात्र नवीन कांदा येईपर्यंत देशातील कांदा भाववाढीला कसे तोंड द्यायचे हा सरकार समोरचा मोठा प्रश्न बनला आहे.

Leave a Comment