संजय दत्तला उपचारासाठी मुंबईला हलविणार?

पुणे दि.२२- पुण्याच्या येरवडा कारागृहात मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणात अवैध शस्त्र बाळगल्याप्रकरणी शिक्षा भोगत असलेला मुन्नाभाई उर्फ संजय दत्त याला मुंबईला उपचारासाठी हलविले जाणार असल्याचे समजते. गेले दोन दिवस संजय दत्त याला उच्च रक्तदाबाचा त्रास होत आहे. त्याची तुरूंगात जाऊन चार डॉक्टरांच्या पथकाने तपासणी केली तेव्हा त्याला पेरिफेरल आर्टरी डिसिज असून त्यामुळे त्याच्या पायांना पुरेसा रक्तपुरवठा होत नसल्याने त्याच्या अधिक तपासण्या करण्याची शिफारस केली गेली आहे.

संजय दत्तला अति धुम्रपान आणि उच्च रक्तदाब यामुळे हा त्रास होत असून त्यासाठी त्याची सीटी अँजिग्राम व आर्टेरियल अँजिओग्राफी करणे गरजेचे आहे. या तपासण्या येथील ससून रूग्णालयात होऊ शकत नाहीत त्यामुळे त्याला मुंबईच्या जेजे रूग्णालयात हलविण्याची शिफारस डॉक्टरांनी केली आहे. संजयला चालताना वेदना होत आहेत.२०१० साली तो येरवडा जेलमध्ये शिक्षा भोगत होता तेव्हाही त्याला हा त्रास झाला होता असे त्याच्यावर उपचार करणार्‍या डॉक्टरांनी सांगितले.

असे असले तरी येरवडा जेल सुपरिटेंडेंट योगेश देसाई तसेच संजयचे वकील रिझवान मर्चंट यांनी मात्र संजयला मुंबईला हलविले जाण्यासंबंधी कांहीही माहिती नाही असे सांगितले आहे. मात्र जेल मधील अन्य अधिकार्‍यांच्या म्हणण्यानुसार संजयला मुंबईला हलविण्यासाठी सरकारकडे प्रस्ताव दिला गेला आहे.

Leave a Comment