नवी दिल्ली – जागतिक मंदीचा मोठा फटका महिंद्र अँण्ड महिंद्र कंपनी या वाहन उद्योगाला बसला आहे. या व्यवस्थापनाने चाकणपाठोपाठ नाशिकचा कारखाना पाच दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याचे वृत्त आहे. कामगारांना या पाच दिवसांचे वेतन दिले जाणार असले तरी या निर्णयामुळे औद्योगिक वसाहतीवर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून औद्योगिक क्षेत्रावर जागतिक मंदीचे सावट घोंगावत आहे. निर्यातदार कारखान्यांची निर्यात काही प्रमाणात कमी झाली आहे. परिणामी लघुउद्योगांवरही मोठा परिणाम होत आहे. जागतिक मंदीचा मोठा फटका वाहन उद्योगाला बसला आहे.
वाहन उद्योगात अग्रेसर मानल्या जाणार्या महिंद्र अँण्ड महिंद्र कंपनीलादेखील मंदीला सामोरे जावे लागत असल्याचे चित्र आहे. म्हणून या कारखान्याने चाकण येथील कंपनी आठवडाभरासाठी बंद करण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. यावरून जागतिक मंदीचे सावट किती गंभीर आहे हे लक्षात येते.
चाकणपाठोपाठ महिंद्र अँण्ड महिंद्र कंपनीने नाशिक कारखानादेखील 25 ते 29 जुलै असे पाच दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याचे वृत्त आहे. या वृत्ताला कंपनीच्या वरिष्ठ अधिकार्यांनी दुजोरा दिला आहे. मागील 15 दिवसांपासून नाशिकच्या कारखान्यात मंदीमुळे नियमित उत्पादन होत नसल्याचे समजते. दर आठवड्याला दोन किंवा तीन दिवस (इन आणि आऊट) कंपनीचे उत्पादन बंद ठेवले जात आहे. त्यात पाच दिवस सलग कंपनी बंद ठेवण्यात येणार असल्यामुळे कामगारांमध्ये चलबिचल निर्माण झाली आहे.
कंपनीबरोबरच या कंपनीच्या सुमारे साडेचारशे वेंडर्सला मोठा फटका बसणार आहे. या साडेचारशे लघुउद्योगांतील कामगारांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण होणार आहे. एकूणच या मंदीचा फटका उद्योगांबरोबर कामगारांनाही बसणार आहे, तर या मंदीचा सामना करण्यासाठी मोठया उद्योगांनी उपाययोजना करण्यासही सुरुवात केली आहे; परंतु लघुउद्योगातील कामगारांवर बेरोजगारीची कुर्हाड कोसळण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.