निर्मितीचा अभिनय रूपेरी पडद्यावर

मागे वळून पाहताना इतिहासावर नजर टाकल्यास लक्षात येतं की बॉलीवूडमध्ये जशी चॉकलेटी हिरोची चलती असते तशी मराठीपटांमध्ये मात्र नसते..ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाईटच्या जमान्यापासूनच्या सिनेमांचा विचार केला तर सुर्यकांत मांढरे, रविंद्र महाजनी, सचिन पिळगावकरांसारखे काही हाताच्या बोटावर मोजता येतील इतके अभिनेते वगळता इतर कोणत्याही देखण्या अभिनेत्यांना रसिक मनांवर आरूढ होता आलं नाही… इतरांनी बाजी मारली ती केवळ आपल्या अभिनयकौशल्याच्या बळावर..पण एकविसाव्या शतकात मात्र सर्व गणितं बदलली असून आजचा जमाना चॉकलेटी नायकांचा आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

स्वप्निल जोशी, अनिकेत विश्वासराव, सिध्दार्थ चांदेकर, सुबोध भावे यांसारखे चॉकलेटी चेहर्‍याचे नायक सध्या तरूणाईच्या गळ्यातील ताईत बनले आहेत. त्यात आता आणखी एका नव्या नायकाची भर पडली आहे. रंगमंचापासून छोटा पडदा आणि मोठ्या पडद्यापर्यंत आपल्या बहारदार अभिनयाने रसिकांना पोट धरून हसवणार्‍या हास्यसम्राज्ञी निर्मिती सावंत यांचा मुलगा अभिनयने आता चंदेरी दुनियेत एंट्री केली आहे. केदार शिंदे यांनी दिग्दर्शित केलेल्या श्रीमंत दामोदरपंतलया 26 जुलै रोजी प्रदर्शित होणार्‍या सिनेमाद्वारे अभिनय रसिकांच्या भेटीला येणार आहे. एका यशस्वी अभिनेत्रीचा मुलगा इतकीच अभिनयची ओळख मर्यादित नसून त्याने आपल्या आईकडून अभिनयाचा वारसा घेत उत्तम अभिनयकौशल्यही संपादन केलं आहे. आजच्या काळातील रसिकांना आवडणारा नायक बनवण्यासाठी जे जे असायला हवं ते सर्व गुण अभिनयच्या अंगी आहेत. अभिनयने अभिनयासोबतच नृत्याचंही प्रशिक्षण घेतलं आहे. कॉमेडीसोबतच अ‍ॅक्शन आणि नृत्यामध्येही तो पारंगत आहे.

Leave a Comment