तर डान्सबार बंदी लागू झालीच नसती-आबा

सांगली- डान्स बारबंदीबाबतचा कायदा कमकुवत करण्याचा राज्य सरकारचा हेतू नाही, तसे असले असते तर आतापर्यंत राज्यात साडे सातवर्ष असलेली डान्सबार बंदी लागू झालीच नसती. या निर्णयाविरोधात लवकरच राज्य सरकार फेरयाचिका दाखल करण्याच्या तयारीत आहे अशा शब्दांत गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरें यांना सुनावले. त्यांनी केलेले सर्व आरोपही आर. आर. पाटील यांनी फेटाळून लावले आहेत.

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी दोन दिवसांपूवी पत्रकारांशी बोलताना डान्सबार बंदी प्रकरण म्हणजे सरकारचे केवळ ढोंग असल्याचे म्हटले होते. सरकारची डान्सबार बंदीची इच्छाच नाही. आता निवडणुका जवळ आल्यात, त्यामुळे हे प्रकरण पुढे आलय. त्यांना पैसा कमी पडत असेल, म्हणून हे प्रकरण पुढे आले आहे, अशा शब्दात खिल्ली उडवली होती.

त्यांनतर हे सर्व आरोप खोडून काढताना आबांनी राज ठाकरेंना डान्सबार बंदी बाबतचा सरकारचा हेतू शुद्ध असल्याचं प्रत्यूत्तर दिले आहे. ‘राज्यातील डान्स बार बंदीबाबत सर्वानुमते विधिमंडळात निर्णय घेतला होता. यावेळी विधी व न्याय विभागाचाही सल्ला घेतला गेला. या कायद्यात त्रुटी राहिल्या असत्या, तर साडेसात वर्षे डान्स बार बंद राहिले नसते’ असे आबांनी यावेळी म्हटले आहे. ते सांगलीमध्ये जिल्हा दौ-यावर आले असताना पत्रकारांशी बोलत होते. सर्वोच्च न्यायालयातही शासनाची बाजू खंबीरपणो मांडली गेली आहे, असंही त्यांनी यावेळी म्हटले आहे. या निर्णयाविरोधात लवकरच राज्य सरकार फेरयाचिका दाखल करण्याच्या तयारीत असल्याचे त्यांनी सांगितले.

Leave a Comment