गुजरात दंगलीमुळेच आयएमचा जन्म

नवी दिल्ली- एनआयएने काही दिवसांपूवीच इंडियन मुजाहिदीनच्या पाच अतिरेक्यांविरुद्ध आरोपपत्र दाखल केले आहे. त्यावरून सध्यां भाजप आणि काँग्रेस नेत्यांमध्ये रणकंदन माजले आहे. इंडियन मुजाहिदीन या अतिरेकी संघटनेचा जन्म २००२ मध्ये झालेल्या गुजरात दंगलीनंतर झाला, असे काँग्रेस प्रवक्ते शकिल अहमद यांनी ट्विट केले. एनआयएच्या आरोपपत्रात असाच उल्लेख असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यावरून या वादाला आता चांगलेच तोंड फुटले आहे. यावरून भाजप व कॉग्रेसच्या नेत्यांनी एकमेंकावर चिखलफेक केली आहे.

यापूर्वी देखील एका मुलाखतीत भाजप, शिवसेना आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जातीय राजकारणात सक्रिय आहेत. त्यामुळे त्यांना अशा राजकारणापासून रोखले पाहिजे. भाजपाच्या या हालचालीवरून ते देशाच्या विभाजनाच्या प्रयत्नात आहेत, असे वाटते. ही मंडळी सांगतात एक आणि करतात दुसरेच, अशा शब्दांत शकिल अहमद यांनी त्यांच्यावर तोफ डागली होती.

अहमद यांच्या या वक्तव्याचा भाजपने देखील त्यांच्या आक्रमक शैलीत समाचार घेतला आहे. काँग्रेसच्या कार्यकाळात गुजरातमध्ये ४० दंगली झाल्या होत्या. त्यात आतापर्यंत दोन किंवा तीन जणांना दोषी ठरविले आहे. शकिल अहमद यांच्या वक्तव्यावरून इंडियन मुजाहिदीनच्या कृत्याबद्दल काँग्रेसला सहानुभूती वाटते आहे, असे म्हणायचे आहे काय, असा सवालही भाजपा नेत्यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे आगामी काळात यावरून वाद रंगण्याची चिन्हे दिसत आहेत.