एसटी कामगार संघटनेचे राज्यव्यापी आंदोलन

पुणे, दि. 22 – एसटी कर्मचार्‍यांच्या पुढील चार वर्षासाठीच्या वेतन कराराची अंमलबजावणी करताना एसटी कामगार संघटनेला विश्‍वासात घेतले जात नाही. त्याविरोधात 6 ऑगस्टपासून संघटनेचे पदाधिकारी आझाद मैदानात उपोषणाला बसणार आहेत, अशी माहिती एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष शिवाजी चव्हाण यांनी दिली.

कामगार वेतन कराराच्या अंमलबजावणीबाबतची परिपत्रके काढताना मान्यता प्राप्त कामगार संघटनेशी चर्चा केली जाईल, असे प्रशासनाने कबूल केले होते. कराराच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीच्यावेळी त्यातील महत्त्वाच्या तरतुदींचा चुकीचा अर्थ लावला जाऊ नये, कामगारांचे आर्थिक नुकसान होऊ नये, यासाठी संघटनेशी चर्चा करणे आवश्यक आहे. मात्र, अशी चर्चा न करताच परिपत्रके जारी केली जात आहेत, असा आरोप चव्हाण यांनी केला. एसटी प्रशासनाच्या या निर्णयाला विरोध करण्यासाठी संघटनेचे राज्यातील सर्व पदाधिकारी 6 ऑगस्टपासून आझाद मैदानात उपोषणाला बसणार आहेत, तशी नोटीस एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक दीपक कपूर यांना देण्यात आली आहे. उपोषणात चालक-वाहक व अन्य कर्मचारी सहभागी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे एसटीच्या राज्यातील वाहतुकीवर त्याचा परिणाम होऊ शकतो, असे चव्हाण यांनी सांगितले.
—————————–