
बिहारच्या सरन जिल्ह्यातल्या एका गावात माध्यान्ह भोजनामुळे २३ मुले मरण पावले ही घटना म्हणजे बिहारच्या शासकीय यंत्रणेने आपल्या बेपर्वाईने केलेली २३ मुलांची हत्या आहे. या आधी केन्द्र सरकारच्या एका यंत्रणेने बिहारमधील माध्यान्ह भोजन योजनेतल्या अन्नाचा दर्जा राखला जात नसल्याचे केन्द्र सरकारला आणि राज्य सरकारलाही कळवले होते. पण त्यामुळे राज्य सरकारही सावध झाले नाही आणि केन्द्र सरकारही सक्रिय झाले नाही. सध्या बिहारच्या सत्तारूढ आघाडीतून भारतीय जनता पार्टी बाहेर पडली आहे. नितीशकुमार आता कॉंग्रेसच्या मागे उभे राहतील अशी आशा कॉंग्रेसच्या नेत्यांना लागली आहे. म्हणून त्यांनी बिहारच्या या गलथानपणाचा जाब त्या सरकारला विचारला . एकंदरीत काही का काही कारणाने गलथानपणा होत गेला आणि २३ गरीब चिमणे जीव बळी पडले. आता प्रकरणाची नवी माहिती बाहेर येत असून ते आचंबित करणारी आहे. ही मुले विषबाधा होऊन मरण पावलेली नाहीत. विषबाधा हा प्रकार वेगळा असतो. मर्यादेपेक्षा अधिक आंबलेले शिळे अन्न खायला दिल्याने जो प्रकार होतो त्याला विषबाधा म्हणता येईल पण या प्रकारात तसे झालेले नाही. मुलांना दिलेले अन्न अगदी गरम आणि ताजे होते. तो विषप्रयोग होता. ताज्या अन्नात विष घालून या मुलांना मारले आहे.
आपल्या अंगांगात आणि रोमारोमात भिनलेल्या बेपर्वाईने हा विषप्रयोग केला आहे. आता बिहार सरकार जागे झाले आहे. एकदा गैरप्रकार झाला की नंतर जागे होणे हा आपला आता राष्ट्रधर्म झाला आहे. कशाचीच काळजी न करता कामे करायची आणि नंतर धावपळ करायची ही आपली कार्यशैली ठरली आहे. उत्तराखंडात पूर येऊन हजारो लोकांचे बळी गेल्यानंतर आपण आपली आपत्ती निवारण यंत्रणा ठीक आहे की नाही हे तपासायला लागतो. आधी दहशतवादी हल्ला करतात आणि आपण नंतर हाय अलर्ट जाहीर करतो. आपण सदा अलर्ट नसतो. संकट येऊन नुकसान झाल्या नंतर अलर्ट होतो. बिहारात माध्यान्ह भोजनात कमालीच्या दुर्लक्षाला २३ लहान गरीब मुले बळी पडली आणि आता सार्या देशात या भोजन योजनेतल्या अन्नाचा दर्जा सुधारण्याचे उपाय योजिले जायला लागले आहेत. आपण देशातल्या गरिबांच्या मुलांना खायला घालतो. ते चांगले असले पाहिजे हे काय नियम करून सांगावे लागते का? सरकारने या बाबतीत काही लेखी नियम केले नाहीत तरी या मुलांना विषारी, शिळे आणि आळ्यांनी भरलेले अन्न देऊ नये हे काय त्यांना अन्न देणार्यांना तारतम्याने कळत नाही का ? त्यासाठी नियम का करावा लागतो?
बिहारच्या या प्रकरणात गचाळपणा तरी किती असावा याला काही मर्यादा आहे की नाही ? शेेतात वापरायची कीटकनाशके ठेवलेल्या खोलीत खोलीत माध्यान्ह भोजनाची सामुग्री ठेवली होती. या स्वयंपाकासाठी वापरले जाणारे तेल या कीटकनाशकांच्या वापरलेल्या डब्यात साठवलेले होते. पण ज्या दिवशी हा प्रकार घडला त्या दिवशी स्वयंपाक करणार्या बाईने तेल समजून एक कीटकनाशकच वापरले असावे असे दिसत आहे. त्यामुळे या कथित तेलाची ङ्गोडणी दिलेली भाजी खाल्लेली मुलेच मरण पावली. ज्यांनी ती भाजी खाणे टाळले त्यांना काही झाले नाही. या मुलांनी ही भाजी का खाल्ली नाही ? कारण तिचा अतीशय उग्र वास येत होता. काही मुलांनी त्या वासामुळे तक्रारही केली होती. पण शिक्षिकेने त्यांना रागावून ती भाजी खायला लावली. एवढा वास येत असताना आणि मुले तक्रार करीत असतानाही या मठ्ठ शिक्षिकेच्या डोक्यात कसला प्रकार म्हणून पडला नाही. यातल्या काही मुलांना उलट्या व्हायला लागल्यावर तिला या प्रकाराचे गांभीर्य कळले. त्यावर तिने मुलांना रुग्णालयात नेण्याची व्यवस्था करायला हवी होती पण काही तरी गडबड दिसायला लागली तेव्हा तिने पहिले कोणते काम केले असेल तर ते म्हणजे पोबारा करणे. अापण पळून गेलो तरी यातून वाचणार नाही एवढेही तिच्या लक्षात आले नाही.
२००१ सालपासून सार्या देशात १० कोटीवर मुलांना सकस अन्न देणारी ही योजना सुरू झाल्यापासून मुलांची शाळांतली उपस्थितीही वाढली आहे आणि त्यांच्या अभ्यासातही प्रगती झाली आहे. देशाच्या भावी पिढीची काळजी कशी घ्यावी याबाबतची ही आदर्श योजना आहे. ती लागू करताना अनेक नियम करण्यात आले आहेत. मुलांना अन्नातून विषबाधा होऊ नये यासाठी घ्यावयाची पूर्व काळजी कशी घ्यावी याचेही उपाय सरकारने योजिलेले आहेत पण, योजनेची अमंलबजावणी करणार्या यंत्रणा आणि व्यक्ती यांच्यात बेङ्गिकिरी पसरली आहे त्यातून केवळ बिहारच नाही तर देशाच्या अनेक भागात असे प्रकार दिसायला लागले आहेत. आपण घेत असलेल्या पगारामुळे आपण काही कामे करण्याला बांधलेलो आहोत आणि आपल्यावर काही जबाबदारी आहे ती निभावली पाहिजे याचे सरकारी यंत्रणेला भानच राहिलेले नाही. आपले कर्तव्य काय आहे याची कोणी काळजीच घेईनासे झाले आहे. टिवल्या बावल्या करीत, सुरक्षेच्या योजना गुंडाळून काम करायचे आणि आपल्याला वरकड उत्पन्न मिळतेय का याची तेवढी काळजी करायची हा आपल्या लोकांचा कामाचा आणि एकूण जगण्याचा नूरच बदलत आहे. पगारापुरते काम करण्यात आणि बहुतेक कामे टाळण्यातच जन्माचे सार्थक आहे असे लोकांत मानले जात आहे.