थोर मुत्सद्दी सी.पी. श्रीवास्तव यांचे निधन

पुणे, दि. 22- आंतरराष्ट्रीय पातळीवरील ज्येष्ठ मुत्सद्दी व प्रशसकीय क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय सल्लागार, पंतप्रधान लाल बहादुर शास्त्री यांचे स्विय सचिव म्हणून काम पाहिलेले सर सी. पी. श्रीवास्तव यांचे सोमवारी सकाळी इटालीतील जिनिव्हा येथे निधन झाले. ते 93 वर्षांचे होते.

सहजयोग ध्यान प्रणालीच्या संचालिका श्रीमाताजी निर्मलादेवी यांचे ते पती होत. सहजयोग परिवारात ते सर सी. पी. नावाने ओळखले जायचे. ते अल्पवयात अनाथ झाले त्यामुळे त्यांनी नातेवाईंकडे राहून शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर ते परदेशात गेले, उच्च शिक्षणानंतर परदेशात मोठ्या पगाराची नोकरी मिळत असतानाही त्यांनी भारतीय प्रशसकीय सेवेत येण्याचा निर्णय घेतला. 1948 मध्ये वाणिज्य विभागाचे विशेष अधिकारी म्हणून ते प्रशसकीय सेवेत दाखल झाले. त्यानंतर मेरठचे जिल्हाधिकारी, शिपींग कॉर्पोरेशन ऑल इंडियाचे संचालक, 1964 ते 66 या काळात ते लाल बहादुर शास्त्री यांचे स्विय सहायक म्हणून काम करताना अनेक ऐतिहासिक घटनांचे साक्षीदार होते. जगप्रसिद्ध ताश्कंद कराराच्या वेळी ते शास्त्रीजींसमवेत उपस्थित होते. 1974 मध्ये युनोच्या इंटरनॅशनल मॅरीटाईम ऑर्गनायझेशनच्या सरचिटणीस पदावर त्यांनी काम केले. तसेच स्विडन येथील वर्ल्ड मॅरिटाईम युनिव्हर्सिटीचे ते संस्थापक कुलगुरू होते. त्यांच्या मागे दोन कन्या व त्यांचे परिवार आहेत.

भारत सरकारने श्रीवास्तव यांना पद्मविभूषण, पद्मभूषण पुरस्काराने गौरविले होते. याशिवाय इग्लंडच्या राणीकडून त्यांना ‘सर’ हा किताब सन्मानपूर्वक देण्यात आला होता. 2005 मध्ये तत्कालीन राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या हस्ते त्यांना लाल बहादुरशास्त्री राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. ‘राजकारणातील मर्यादा पुरुषोत्तम-शास्त्री, ‘भ्रष्टाचार’ ही श्रीवास्तव यांची दोन पुस्तके विशेष गाजली. निवृत्तीनंतर अलिकडच्या काळात पुण्यात एनडीए रस्त्यावरील त्यांच्या फाार्महाऊसमध्ये ते दहा वर्षे वातव्याला होते. या काळात अनेक पुणेकरांशी त्यांचे ऋणानुबंध जुळले होते.

Leave a Comment